मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी पुण्यात राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या कामावर बोलताना जोरदार टोलेबाजी केली. “माझ्या नवऱ्याच्या हातात सत्ता येईल तेव्हाच महाराष्ट्रातील रस्ते चांगले होतील,” असं मत शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी राज्य सरकारकडून अद्याप काहीच चांगलं काम घडलेलं नाही, असं म्हणत शिंदे-फडणवीस सरकारला टोलाही लगावला. त्या पुण्यात पत्रकारांशी बोलत होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शर्मिला ठाकरे म्हणाल्या, “किमान रस्ते तरी नीट करा. स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे झालीत, आता आपण ७५ वर्षे साजरी करत आहोत. महाराष्ट्र राज्य देशाला ४० ते ५० टक्के कर देतो. महाराष्ट्र केंद्राला करातून सर्वाधिक पैसे देतो, मग तुम्ही तुमचं राज्य तर नीट करा.”

“माझ्या नवऱ्याच्या हातात सत्ता येईल तेव्हाच महाराष्ट्रातील रस्ते चांगले होतील”

“आपले रस्ते चांगले होतील अशी आपण इच्छ व्यक्त करुयात. काम करण्याची मानसिकता हवी. माझ्या नवऱ्याच्या हातात सत्ता येईल तेव्हाच महाराष्ट्रातील रस्ते चांगले होतील, असं मला वाटतं,” असं मत शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केलं.

“अजून तरी काही चांगलं झालेलं नाही, पण…”

“आपण कायम आपल्या आयुष्यात काही तरी चांगलं झालं पाहिजे असे चांगले विचार करावेत. अजून तरी काही चांगलं झालेलं नाही, पण आता होईल,” असं म्हणत त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला टोलाही लगावला.

“मी गडकरींना रात्री १२ वाजता फोन केला होता”

शर्मिला ठाकरे मुंबई-गोवा महामार्गाच्या स्थितीवर बोलताना म्हणाल्या, “नितीन गडकरी घरी आले होते. तेव्हा त्यांनी सांगितलं की वहिनी आजच तुमचं नाव भाषणात घेतलं. मी त्यांना रात्री १२ वाजता फोन करून मुंबई-गोवा रस्त्याकडे बघा, किती खड्डे आहेत, असं सांगितलं होतं. यानंतर नितीन गडकरी यांनी भाषणात माझा उल्लेख केला,” असं शर्मिला ठाकरे यांनी सांगितलं.

हेही वाचा : सरकारला पाठिंबा दिला याचा अर्थ असा नाही आम्ही सर्वच खपवून घेऊ – राजू पाटील

“आपल्याकडेच राजकारणी मुद्दाम चांगले रस्ते का करत नाहीत?”

“माझं म्हणणं असं आहे महाराष्ट्र मागासलेलं राज्य नाही. महाराष्ट्र राज्याची सीमा कोणत्याही बाजूने सोडली तर गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, हैदराबाद या सगळ्या ठिकाणी गुळगुळीत रस्ते दिसतात. आपल्याकडेच राजकारणी मुद्दाम चांगले रस्ते का करत नाहीत?” असा सवालही शर्मिला ठाकरेंनी केला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharmila thackeray on raj thackeray shinde fadnavis government and roads in maharashtra svk 88 pbs
Show comments