महापालिकेच्या जन्म-मृत्यू कार्यालयात पैसे दिल्याशिवाय दाखलाच मिळत नाही, अशा तक्रारी अनेक नगरसेवकांनी केल्यानंतर या कार्यालयातील भ्रष्टाचार उघड झाला आहेच, शिवाय या कार्यालयात पैसे दिल्यानंतरही दाखला मिळत नाही, असेही अनुभव नागरिकांना आले आहेत. एक विधवा महिला तिच्या पतीचा मृत्यूदाखला मिळवण्यासाठी गेले आठ-नऊ महिने प्रयत्न करत आहे आणि तरीही तिचा दाखला हेतूत: अडवण्यात आल्याचाही प्रकार या निमित्ताने उघड झाला आहे.
जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयातील भ्रष्टाचाराचा फटका पुणेकरांना सातत्याने बसत असून या गलथान व भ्रष्ट कारभारावर इलाज करता यावा यासाठी ज्यांना नातेवाईकांचा मृत्यूदाखला मिळण्यासाठी आठ दिवसांपेक्षा अधिक वेळ लागला आहे, अशा नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन ग्राहक पंचायतने केले होते. या आवाहनानुसार अनेक नागरिकांनी संघटनेकडे तक्रारी केल्या असून त्यांची महापालिका कर्मचाऱ्यांकडून कशी अडवणूक केली जात आहे याची माहिती या तक्रारींमधून दिली आहे.
एका विधवा महिलेने या संबंधीचा अनुभव तिच्या तक्रारीतून मांडला आहे. पतीचा दाखला मिळवण्यासाठी या महिलेचे गेले नऊ महिने सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. तरीही तिला संबंधित कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दाद दिलेली नाही. महिलेच्या पतीचे निधन झाल्यानंतर महापालिकेतील एका कर्मचाऱ्याने तिच्याकडून दाखला मिळवून देण्यासाठी एकदा पाचशे आणि एकदा एक हजार रुपये घेतले; पण दाखला काही मिळाला नाही. दाखल्यासाठी पुन्हा दोन हजार रुपयांची मागणी केली जात असल्याचे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
कसबा पेठेतील मुख्य कार्यालयातील रजिस्टरमध्ये मी स्वत: माझ्या पतीच्या नावाची नोंद बघितली आहे; पण तेथील कर्मचारी ते नाव संगणकात नाही असे सांगतात आणि दाखला द्यायला नकार देतात. हा दाखला मला जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत मला कुठल्याही योजनेच्या लाभासाठी अर्ज करता येत नाही. त्यामुळे त्या लाभांपासूनही मी वंचित आहे आणि एका वर्षांच्या आत हा दाखला मिळवून मी अर्ज करू शकले नाही, तर योजनांचा लाभ मला पुढेही मिळणार नाही, असे या महिलेचे म्हणणे आहे.
अशी परिस्थिती असली, तरी महापालिका अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी मात्र दाखला अडवून धरला आहे. मुख्य कार्यालयातून दाखल्याचा क्रमांक आणा असे क्षेत्रीय कार्यालयात सांगितले जाते आणि मुख्य कार्यालयात गेले की, वेगळीच कागदपत्रे मागितली जातात, अशीही या महिलेची तक्रार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा