जेजुरीहून सोलापूर रस्त्यावर येणाऱ्यांसाठी जवळचा रस्ता म्हणून शिंदवणे घाटातून जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. मात्र, या घाटात अतिशय तीव्र उतार, अवघड वळणे आणि संरक्षक कठडय़ाचा अभाव यामुळे शिंदवणे घाट मृत्यूचा सापळा बनला आहे. या घाटात गेल्या वर्षभरात चार ते पाच अपघात झाल्यानंतरही त्यात बदल झालेला नाही.
जेजुरी ते सोलापूर रस्ता या दरम्यान हा जवळचा मार्ग आहे. त्यात पुणे शहरात वाहतूक कोंडी असल्यामुळे बरेच जण या रस्त्याचा वापर करतात. गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्यावर वाहनांची संख्या वाढली आहे. एक महिन्यापूर्वीच शिंदवणे घाटात झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला होता. तर काही महिन्यांपूर्वी एक पेपर वाहून नेणारा ट्रक सरळ खाली गेला होता. तसेच, एका पीकअप व्हॅनचाही अपघात झाला होता. याबाबत वेळोवेळी स्थानिक नेते आणि प्रशासनाकडे या ठिकाणी कठडे बांधण्याची मागणी करण्यात आली. मात्र, त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात येत आहे. शिरुर मतदार संघातील शिंदवणे हे शेवटचे गाव आहे. त्यामुळे शिरुर मतदार संघातील नेत्यांचे या गावाकडे नेहमीच दुर्लक्ष राहिलेले आहे. या घाटात धोकादायक वळण, अपघातप्रवण क्षेत्र अशा सूचनांचे फलक लावलेले नाहीत, अशी माहिती येथील स्थानिक लोकांनी दिली.
अंबळेगावचे नितीन डोळे यांनी सांगितले की, अलीकडे या रस्त्यावर वाहनांची रहदारी वाढली आहे. शिंदवणे घाटात एकापाठोपाठ तीव्र वळणे आहेत. त्यामुळे नवीन चालकाला ती पटकन समजत नाहीत. थोडीशी जरी चूक झाली तरी अपघात होण्याची शक्यता आहे. संध्याकाळी नवीन व्यक्तीला वाहन चालविणे या ठिकाणी अवघड आहे. अवघड वळणे काढून, या रस्त्यावर कठडे बांधावेत म्हणून शासनाकडे मागणी केली आहे. पण त्यावर काहीच होताना दिसत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा