पुणे : भारतीय जनता पक्षासमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खरी शिवसेना आहे. शिंदे गटाचे जे लोक आमच्याबरोबर आले आहेत. त्यांच्या जागेवर आम्ही दावा करणार नाही. शिवसेनेच्या उर्वरीत जागांबाबत एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या जागेवर भाजप दावा करत असल्याच्या चर्चेत तथ्य नसल्याचे बुधवारी स्पष्ट केले.
भाजपच्या ताब्यात नसलेल्या पण पक्षाला अनुकूल असलेल्या आणि शिवसेनेचा पारंपारिक बालेकिल्ला असलेला कल्याण लोकसभा मतदार संघांत कमळ फुलविण्याचा निर्धार भारतीय जनता पक्षाने केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत या मतदार संघाचे आमदार आहेत. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी शिंदे गटाच्या जागा लढविण्याचा प्रश्नच येत नाही, असे स्पष्ट केले. जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एका कार्यक्रमाला जाण्यासाठी पुण्यात आल्यानंतर फडणवीस पत्रकारांशी बोलत होते. भाजपचे लोकसभा मिशन भारत आणि महाराष्ट्र आहे. बारामती महाराष्ट्रात आहे, याचा फडणवीस यांनी पुनरूच्चार केला.
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत शिवसेनेचे चिन्ह गोठवण्याची मागणी करण्यात आली आहे का, याबाबत मला माहिती नाही. सर्वोच्च न्यायालयात ही बाब असल्याने जबाबदारीने बोलले पाहिजे. या विषयाची मला माहिती नाही. त्यामुळे त्यावर बोलणे योग्य होणार नाही, असे फडणवीस यांनी सांगितले.