पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेतील सत्तासंघर्ष तीव्र झाला असतानाच मुंबईप्रमाणेच पुण्यातून शिंदे गटाचे कामकाज शिवसेना भवनातून चालणार आहे. सारसबाग परिसरात शिंदे गटाकडून एका इमारतीमध्ये प्रति शिवसेना भवनाचे काम सुरू करण्यात आले आहे. ‘बाळासाहेब ठाकरे शिवसेना भवन’ असे त्याचे नामकरण करण्यात आले असून नव्या वर्षापासून या शिवसेना भवनातून प्रत्यक्ष कामकाज सुरू करण्यात येईल, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर राज्यभर शिवसेनेत दोन गट पडले आहेत. एकनाथ शिंदे गटाकडून वेगवेगळ्या शहरांमध्ये कार्यालय उभे करणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. आमदार सदा सरवणकर यांनी मुंबईमध्ये दादर भागात प्रति सेनाभवन उभारणार असल्याची घोषणा केल्यानंतर शिंदे गटाचे शिवसेना शहराध्यक्ष प्रमोद उर्फ नाना भानगिरे यांनीही पुण्यात प्रती शिवसेना भवन उभारले जाईल, असे जाहीर केले होते. पुण्याच्या मध्यवर्ती भागातील काही जागांची पाहणीही शिंदे गटाकडून करण्यात आली होती. प्रति शिवसेना भवनासाठी सारसबाग येथील इमारतीमधील जागा निश्चित करण्यात आली आहे.
राज्य आणि केंद्र सरकार तसेच महापालिकेच्या विविध योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांचे कामकाज शिवसेना भवनातून केले जाईल. या भवनाला बाळासाहेब ठाकरे शिवसेना भवन असे नाव देण्यात आले असून सध्या स्थापत्यविषयक कामे सुरू आहेत. हे भवन चार हजार चौरस फूट जागेत असून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी चोवीस तास कार्यकर्ते येथे असतील, असे शिंदे गटाचे नाना भानगिरे यांनी सांगितले. सध्या सुरू असलेली कामे अंतिम टप्प्यात आली असून डिसेंबरपर्यंत ती पूर्ण होतील आणि नव्या वर्षापासून बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे काम या भवनातून सुरू होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भवनाचे उद्घाटन करण्याचे नियोजित असल्याचेही भानगिरे यांनी सांगितले.