आपला साधेपणा दाखवण्यासाठी आवर्जून सुती किंवा खादीच्या झब्ब्यांना पसंती देणाऱ्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची पावले आता वळली आहेत, ते ‘शो’गिरी करणाऱ्या लिननच्या शर्टकडे! लोकसभा निवडणुकावेळी मोदी कुडत्याला मोठी मागणी होती. मात्र, आता लिननचा शर्ट ही कार्यकर्त्यांची ओळख झाली आहे. महिलांसाठी कलकत्ता कॉटन आणि खादी सिल्कच्या साडय़ा मात्र आपली आब राखून आहेत.
खादीचा झब्बा किंवा कुडता ही राजकीय नेते, कार्यकर्ते यांची ओळख होती. खादीचे कपडे म्हणजे साधेपणा मानला जायचा. त्यानंतर अगदी खादी नाही, तरी सुती झब्ब्यांनी आपली जागा निर्माण केली. मग त्यातही मालिका, चित्रपट यांनुसार झब्बा, कुडत्यांचा ट्रेंडही बदलत गेला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान संग्राम कुडता, जिन्सवर घालता येईल असा हाफ कुडता याला कार्यकर्त्यांची विशेष पसंती होती. त्या वेळी मोदी कुडता हा सर्वाधिक लोकप्रिय प्रकार झाला होता. मात्र, या निवडणुकीत कार्यकर्त्यांची पसंती लिननच्या शर्टला दिसत आहे. आपला साधेपणा दाखवण्यासाठी म्हणून सुती झब्बा वापरणाऱ्या कार्यकर्ते आता स्टेटस सिम्बॉल म्हणून लिननच्या पांढऱ्या कडक शर्टकडे वळले आहेत.
निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या ‘शो’गिरीचा फायदा करून घेण्यासाठी लिननच्या शर्टाची निर्मिती करणाऱ्या कंपन्याही सरसावल्या आहेत. सुती कपडय़ांच्या तुलनेत लिनन हे बरेच महाग असल्यामुळे कळणाऱ्यांना ‘किंमत’ही कळत आहे. महाग असूनही सुती कपडय़ांपेक्षा लिननला अधिक मागणी असल्याचे जयहिंद कलेक्शनमधील विक्रेते सांगतात.  ‘अमुक एका ब्रँडचा लिनन शर्ट वापरतो, म्हणूनच मला उमेदवारी मिळाली.’ किंवा माझा लुक मला यश मिळवून देईल कारण मी वापरतो अमुक ब्रँडचा लिननचा शर्ट. अशा प्रकारच्या जाहिराती सध्या रेडिओवर वाजत आहेत. महिला कार्यकर्त्यां किंवा नेत्यांमध्ये मात्र, कलकत्ता कॉटनची साडी अजूनही भाव खाऊन आहे. त्यानंतर मात्र प्रिंटेड रॉ सिल्क, खादी सिल्क याला महिला कार्यकर्त्यांची पसंती आहे. जास्तीत जास्त साधे दिसावे, यासाठी उमेदवारांची आणि हटके दिसण्यासाठी कार्यकर्त्यांची धडपड दिसत आहे.

‘कॉटनपेक्षा लिननची मागणी मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. गेल्या काही काळातील लिननला सर्वाधिक मागणी ही आता आहे. कॉटनपेक्षाही आता लिननच्या शर्ट्सची मागणी जवळपास दुपटीने वाढली आहे. तरूणांकडून लिननची विशेष मागणी आहे. मात्र, ती कोणत्याही विशिष्ट ब्रँडसाठी दिसत नाही. त्यापेक्षा शर्टचा एकूण ‘लुक’ ग्राहक पाहात आहेत.’
– व्यंकटेश राठी (‘बोल्ड अँड एलिगंट’ दुकानाचे व्यवस्थापक)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा