पिंपरी : मालिकांच्या चित्रीकरणामुळे मतदारसंघासाठी वेळ देत नसल्याच्या विरोधकांकडून होणा-या टीकेनंतर शिरुरचे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पुढील पाच वर्षांसाठी अभिनय क्षेत्राला रामराम करण्याची घोषणा केली आहे. पूर्णवेळ मतदारसंघासाठी काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मतदानाच्या दोन दिवस अगोदर हा निर्णय घेऊन कोल्हे यांनी टीकाकारांना गप्प बसवण्याचा प्रयत्न केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या भूमिकेमुळे डॉ. कोल्हे घराघरात पोहोचले आहेत. मात्र, २०१९ मध्ये शिरुरमधून खासदार झाल्यानंतर त्यांच्यावर मतदारसंघात वेळ देत नसल्याची टीका सातत्याने केली जाते. चित्रीकरणात व्यस्त असल्याचे सांगत विरोधकांकडून हा प्रचाराचा मुद्दा केला. त्यांना याच मुद्यावरुन प्रचारात लक्ष केले. अभिनेत्याला मतदारसंघाचे किंवा जनतेचे प्रश्न काय समजणार, त्यांना जनतेसाठी वेळ नाही. चित्रीकरणातच व्यस्त आहेत असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हे यांना लक्ष केले होते. यापार्श्वभूमीवर कोल्हे यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा : चिंचवडमध्ये प्राचीन धनेश्वर मंदिरात महादेवाच्या पिडींवर चंदनाचा लेप; अशी आहे आख्यायिका!

खासदार कोल्हे यांनी आगामी पाच वर्षांसाठी अभिनय क्षेत्राला रामराम केला आहे. राजकारण हा अर्धवेळ व्यवसाय नसून पूर्णवेळ सेवा करण्याचे क्षेत्र आहे. तळेगाव-चाकण-शिक्रापुर महामार्ग, पुणे-अहमदनगर महामार्ग यासाठी १९ हजार ५०० कोटी रुपयांचा निधी आला आहे. निविदा प्रक्रिया सुरु आहे. हे प्रकल्प प्राधान्याने मार्गी लावणे गरजेचे आहे. दोनशे खाटांचे रुग्णालय, राष्ट्रीय वन औषधी संशोधन केंद्र हे प्रकल्प दृष्टीक्षेपात आहेत. या प्रकल्पांसाठी पूर्ण वेळ काम करावे लागणार आहे. मालिक विश्वात काम करताना यासाठी एवढा वेळ देणे शक्य नाही. त्यामुळे मालिका विश्व, अभिनयाला पुढील पाच वर्षांसाठी रामराम करण्यास काहीच हरकत नाही. यामुळे चाहत्यांची निराशा होऊ शकते. परंतु, शिरुर लोकसभा मतदारसंघातील जनतेसाठी याबाबतचा निर्णय घ्यावा लागेल. पाच वर्षांसाठी मालिका विश्वातील अभिनयाला रामराम करणार असल्याची घोषणा डॉ. कोल्हे यांनी केली. छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणे एवढाच अपवाद राहिल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shirur lok sabha candidate amol kolhe 5 years break from acting career only work for shirur constituency pune print news ggy 03 css