पिंपरी : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना मागील निवडणुकीत भोसरी आणि हडपसरमधून मताधिक्य मिळाले नव्हते. त्यामुळे डॉ. कोल्हे यांची धावाधाव सुरू असून, भोसरीत सातत्याने दौरे, प्रचार फेऱ्या वाढल्या आहेत. तर, राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनीही मताधिक्य कायम राहावे, यासाठी भोसरीत लक्ष घातले आहे. दोन्ही उमेदवारांचा भोसरीतील प्रचारावर भर दिसून येत आहे.
भोसरी विधानसभा मतदारसंघ शिरूर लोकसभा मतदारसंघात येतो. मागील निवडणुकीत आताचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांना भोसरीतून ३७ हजार आणि हडपसर विधानसभा मतदारसंघातून पाच हजार ३७० मतांची आघाडी मिळाली होती. शहरी असलेल्या या दोन्ही मतदारसंघातच आढळरावांना आघाडी होती, तर डॉ. कोल्हे पिछाडीवर होते. आता परिस्थिती बदलली आहे. डॉ. कोल्हे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून, तर आढळराव हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत. शिरूरमधील सहापैकी पाच आमदार महायुतीचे आहेत. केवळ शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार हे डॉ. कोल्हे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे कागदावर महायुतीची ताकत दिसत आहे. कागदावर महायुतीची जास्त ताकत असल्याने डॉ. कोल्हे हे पायाला भिंगरी लावून फिरत आहेत.
हेही वाचा : पिंपरी : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर हवाई दलाचा टेम्पो उलटला; मोठी वाहतूक कोंडी
राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध असतानाही मागील वेळी डॉ. कोल्हे यांना भोसरीतून मताधिक्य मिळू शकले नव्हते. आता भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, सर्व माजी नगरसेवक हे आढळराव पाटील यांच्यासोबत आहेत. त्यामुळे भोसरीतील मताधिक्य वाढविण्यासाठी डॉ. कोल्हे यांचा प्रयत्न दिसून येत आहे. भोसरीत प्रचार फेरी, पदयात्रा, कार्यकर्ता मेळाव्याच्या माध्यमातून त्यांनी प्रचारावर भर दिला आहे. भोसरी विधानसभेत उद्धव ठाकरे यांना मानणारा हक्काचा काही मतदार आहे. ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवारांना मानणाऱ्या मतांवरच डॉ. कोल्हे यांची भोसरीत भिस्त दिसते. तर, मागील मताधिक्य कायम राहावे यासाठी आढळराव पाटील यांचेही दौरे वाढले आहेत. त्यांनी भाजप कार्यालयात जात माजी नगरसेवकांची बैठक घेतली.