शिरुर : महाशिवरात्रीला शिरुर येथील रामलिंग मंदिरात यात्रा असते . काल बैलगाड्या शर्यतीनंतर तीन दिवस चाललेल्या या यात्रेची समाप्ती झाली . यात्रे दरम्यान या परिसरात निर्माण झालेल्या प्लॅस्टिकच्या व अन्य कचऱ्याचे संकलन जीवन विकास मंदिर संस्थेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी करीत या परिसरात स्वच्छता मोहिम राबवून हा परिसर चकाचक केला.
जीवन विकास मंदिर संस्थेच्या शाळेतील इयत्ता सातवी आठवी व नववीतील ५० हून आधिक विद्यार्थी विद्यार्थिनी आज सकाळी वाहनामधून स्वच्छतेची साधने, झाडू व कचरा संकलनासाठीच्या पिशव्या घेवून दाखल झाले . हाती झाडू घेवून त्यांनी परिसराची स्वच्छता केली व प्लॅस्टिक कचराचे संकलन केले .२५ किलोच्या ५० हून आधिक कचरा संकलन बॅग मध्ये हा कचरा गोळा करण्यात आला .
जीवन विकास मंदिर संस्थेचे अध्यक्ष माजी नगरसेवक रवींद्र धनक म्हणाले की विद्यार्थ्यामध्ये सामाजिक बांधिलकी व स्वच्छतेचे महत्व रुजविण्यासाठी शाळेच्या वतीने स्वच्छता मोहिम राबविण्यात आली . आरोग्य चांगले राहण्यासाठी वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता महत्वाची आहे. यापुढे दरवर्षी रामलिंग यात्रे नंतर या परिसरात शाळेच्या वतीने स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार असल्याचे धनक यांनी सांगितले .
रामलिंगच्या सरपंच शिल्पा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांच्या या स्वच्छता मोहिमेस भेट देऊन विद्यार्थी करत असलेल्या या स्वच्छता मोहिमेबद्दल अभिनंदन केले . जीवन विकास मंदिर शाळेचे शिक्षक दिलिप शिंदे , अजय सोनवणे , अश्विनी मोरे व रेणूका जाधव आदी यावेळी उपस्थित होते .