पुणे : श्री शिवजयंतीनिमित्त मध्य भागातून काढण्यात येणारी मिरवणूक, तसेच ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेनिमित्त मध्य भागातील वाहतूक व्यवस्थेत बुधवारी बदल करण्यात येणार आहेत. पदयात्रेनिमित्त सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. मध्य भागातील लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी रस्ता, बाजीराव रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
मिरवणुकीची सांगता होईपर्यंत मध्य भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल लागू राहणार आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली. केंद्रीय युवा कार्यक्रम, क्रीडा मंत्रालयाकडून ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रा काढण्यात येणार आहे. पदयात्रेचा प्रारंभ शिवाजीनगर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर सकाळी नऊच्या सुमारास होणार आहे. या पदयात्रेत मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी होणार आहेत. त्यामुळे जंगली महाराज रस्ता, संचेती चौक, खंडोजीबाबा चौकदरम्यान वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. अभियांत्रिकी चौकातून येणारी वाहतूक मंगळवार पेठेतील कामगार पुतळ्याकडे वळविण्यात आली आहे. तेथून वाहनचालक इच्छितस्थळी जातील.
डेक्कन जिमाखाना भागातील खंडोजीबाबा चौक ते फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत (नामदार गोपाळ कृष्ण गोखले पथ) वाहतूक टप्याटप्याने बंद करण्यात येणार आहे. कोथरुड, कर्वे रस्त्याने डेक्कनकडे येणारी वाहतूक एसएनडीटी महाविद्यालयमार्गे विधी महाविद्यालय, तसेच नळस्टाॅपकडे वळविण्यात येणार आहे. तेथून वाहनचालकांनी इच्छितस्थळी जावे. टिळक रस्त्याने खंडोजीबाबा चौकाकडे येणारी वाहतूक गरज भासल्यास पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. केळकर रस्तामार्गे काकासाहेब गाडगीळ पूल, भिडे पूलावरून जाणारी वाहतूक गरज भासल्यास पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. केळकर रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांनी टिळक रस्ता, शास्त्री रस्तामार्गे इच्छितस्थळी जावे.
पदयात्रेसाठी वाहने लावण्याची व्यवस्था
अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावरून ‘जय शिवाजी जय भारत’पदयात्रेचा प्रारंभ होणार आहे. पदयात्रेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांनी संगमवाडी पार्किंग येथे वाहने लावावीत. कर्वे रस्ता, कोथरूडकडून येणाऱ्या वाहनचालकांनी नदीपात्रातील रस्त्यावर वाहने लावावीत. स्वारगेट, हडपसर, दांडेकर पूलमार्गे येणाऱ्या वाहनचालकांनी नदीपात्रातील रस्त्यावर वाहने लावावीत. गणेशखिंड रस्त्याने येणाऱ्या विद्यार्थ्यांनी कृषी महाविद्यालयाचे मैदान परिसरात वाहने लावावीत.
मध्य भागात सकाळी सहानंतर बदल
श्री शिवजयंतीनिमित्त मुख्य मिरवणूक शहरातील मध्य भागातील छत्रपती शिवाजी रस्त्यावरून काढण्यात येते. मुख्य मिरवणुकीनिमित्त बुधवारी सकाळी सहा वाजल्यानंतर मध्य भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. मिरवणुकीची सांगता होईपर्यंत या भागातील वातूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेची सांगता झाल्यानंतर वाहनचालकांनी जंगली महाराज रस्ता, डेक्कन जिमखानामार्गे इच्छितस्थळी जावे. गणेश रस्ता ते जिजामाता चौक, तसेच अप्पा बळवंत चौक ते बुधवार पेठेतील हुतात्मा चौक दरम्यानचा रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. मिरवणूक लक्ष्मी रस्त्यावर आल्यानंतर या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. पदयात्रेची सांगता झाल्यानंतर टिळक रस्त्याने डेक्कनकडे जाणारी वाहतूक पूर्ववत करण्यात येईल. एसएसपीएमएस प्रशाला परिसरात मुख्य मिरवणुकीची सांगता होणार आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी पूल वाहतुकीस बंद राहणार आहे. नारायण पेठ, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूल, काँग्रेस भवनमार्गे वाहनचालक इच्छितस्थळी जाऊ शकतील.