प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये बुधवारी दुपारी एका वरिष्ठ लिपिकाला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांने बेदम मारहाण करीत तोडफोड केली. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा ‘आरटीओ’तील अधिकारी व कर्मचाऱ्यांची तीव्र निषेध नोंदविला असून, कठोर कारवाई होईपर्यंत कामबंद आंदोलनाचा निर्णय घेतला आला. त्यामुळे दुपारनंतर कार्यालयातील कामकाज ठप्प झाले होते.
शिवसेनेच्या शहर वाहतूक सेनेचे पदाधिकारी असलेल्या एकनाथ ढोले यांच्याविरुद्ध पोलिसांनी मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मारहाण, धमकावणे व सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रय बळवंत थोरात (वय ५७) असे मारहाण झालेल्या वरिष्ठ लिपिकाचे नाव आहे. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार थोरात हे त्यांच्या कार्यालयात काम करीत असताना ढोले हे दुपारी एकच्या सुमारास एका ट्रॅव्हल्स कंपनीचे काम घेऊन त्या ठिकाणी आले. संबंधित कामासाठी प्रवाशांच्या नावाची यादी देण्याची मागणी थोरात यांनी केली. अशी मागणी लेखी देण्याचे ढोले यांनी सांगितले असता, थोरात यांनी तसे लेखीही दिले. त्यावरून दोघांत वाद निर्माण झाला. त्यानंतर ढोले यांनी थोरात यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणे टेबलवरील काचही फोडली व कागदपत्र इतरत्र फेकून दिली. या मारहाणीमध्ये थोरात यांच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या आहेत.
भर कार्यालयात झालेल्या या मारहाणीच्या घटनेची दखल अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांनीही घेतली. त्यांनी तातडीने कामबंद आंदोलन सुरू केले. त्यानंतर दुपारनंतर कार्यालयातील कामकाज ठप्प झाले. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या घटनेचा तीव्र निषेध करीत आरोपीला अटक झाल्याशिवाय कामकाज सुरू न करण्याची भूमिका घेतली आहे. या प्रकरणी प्रादेशिक परिवहन अधिकारी अरुण येवला यांनीही तीव्र शब्दांत निषेध नोंदविला. कार्यालयात खासगी सुरक्षा व्यवस्था पुरविण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र, एक वर्षांपासून तो प्रलंबित आहे. आणखी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचेही प्रस्ताव आहे. घटनेच्या ठिकाणी सीसीटीव्ही नव्हता. मारहाण प्रकरणात कठोर कारवाई होईपर्यंत कामबंद आंदोलन सुरू राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘आरटीओ’मध्ये लिपिकाला मारहाण; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने कामकाज ठप्प
प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये बुधवारी दुपारी एका वरिष्ठ लिपिकाला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांने बेदम मारहाण करीत तोडफोड केली. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
First published on: 01-08-2013 at 02:39 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sainik beating rto clerk in pune