पीएमपीच्या तिकीटदर आकारणीसाठी असलेली टप्पा (स्टेज) पद्धत रद्द करून किलोमीटरप्रमाणे तिकिटाची आकारणी करावी, या मागणीसाठी शिवसेनेतर्फे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली असून या मागणीची संचालकांनी तातडीने दखल घ्यावी, असे पत्र प्रशासनाला देण्यात आले आहे.
कमी अंतरात प्रवास करणाऱ्या पीएमपीच्या प्रवाशांना मोठा भुर्दंड पडत असून टप्पा पद्धतीमुळे एक ते दीड किलोमीटरसाठी दहा रुपयांचे तिकीट काढावे लागत आहे. त्यामुळे टप्पा पद्धत रद्द करावी, या मागणीसाठी शहरातील स्वयंसेवी संस्थांनी आंदोलन सुरू केले असून या आंदोलनाला शिवसेनेने पाठिंबा दिला आहे.
पुणेकरांना लोकाभिमुख व सक्षम सार्वजनिक प्रवासी सेवा उपलब्ध करून देणे हे पीएमपीचे मुख्य उद्दिष्ट असले, तरी प्रत्यक्षातील परिस्थिती मात्र वेगळी आहे. महागाईने त्रस्त असलेल्या प्रवाशांना पीएमपीच्या तिकिटांमुळे आणखी भरुदड पडत आहे. या प्रकाराबाबत पुणेकरांमध्ये असंतोष असून त्याची संचालकांनी तातडीने दखल घ्यावी, असे निवेदन शिवसेनेचे शहरप्रमुख श्याम देशपांडे, अजय भोसले तसेच महापालिकेतील गटनेता अशोक हरणावळ यांनी अध्यक्षांना दिले आहे. पीएमपीने तिकीटदराची आकारणी किलोमीटरप्रमाणे करावी व त्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
पुणेकरांची मागणी प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेनेतर्फे स्वाक्षरी मोहीमही सुरू करण्यात आली असून सर्व स्वाक्षऱ्यांचे निवेदन संचालकांच्या आगामी बैठकीत दिले जाणार आहे.

Story img Loader