पश्चिम महाराष्ट्र म्हणजे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा पवार काका-पुतण्याच्या प्रभावक्षेत्रातील मावळ व शिरूरच्या जागा शिवसेनेने मोठय़ा फरकाने जिंकल्या, तो दारुण पराभव पवारांच्या जिव्हारी लागला होता. आता लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकल्यानंतर प्रारंभीच शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी या दोन्ही जागा पुन्हाजिंकण्याचा संकल्प सोडला आहे. तर, गमावलेल्या जागा खेचून आणण्याचा चंग राष्ट्रवादीने बांधला आहे. त्यामुळेच आगामी काळात शिवसेना व राष्ट्रवादीत थेट सामना होणार असून मनसे, भाजप व काँग्रेसची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामती मतदारसंघात यापूर्वी पिंपरी-चिंचवडचा समावेश होता. अनेक डावपेच करूनही पवारांना पिंपरीतून अपेक्षित मतदान कधीही मिळाले नाही. मतदारसंघांच्या पुनर्रचनेची संधी साधून पवारांची डोकेदुखी ठरलेल्या पिंपरी-चिंचवडला बारामतीतून हद्दपार करण्यात आले आणि मावळ-शिरूरचे क्षेत्र निश्चित करताना शहराची वाटणी करण्यात आली. भोसरी शिरूरला तर चिंचवड-पिंपरी मावळ मतदारसंघाला जोडण्यात आले. शिरूरमधून शिवाजीराव आढळराव पावणेदोन लाखांच्या तर मावळातून गजानन बाबर ८० हजारांच्या फरकाने निवडून आले व राष्ट्रवादीच्या गडावर शिवसेनेने भगवा फडकवला. त्याचा राष्ट्रवादीला प्रचंड धक्का बसला होता. दिल्लीच्या राजकारणात एकेक खासदार महत्त्वाचा असल्याने झालेल्या चुका दुरुस्त करून गमावलेल्या दोन्ही जागाजिंकण्याचे ध्येय राष्ट्रवादीने ठेवले आहे. पिंपरी पालिका निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर विजयोत्सव साजरा करणाऱ्या कार्यकर्त्यांना, ‘पालिका दिली, आता मावळ-शिरूर द्या,’ असे भावनिक आवाहन अजितदादांनी केले होते. हिंजवडीत शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या दोन्ही जागा जिंकण्याचा निर्धार करण्यात आला.
या पाश्र्वभूमीवर, लोणावळ्यात गटप्रमुखांचा मेळावा घेऊन उद्धव ठाकरे यांनी या दोन्ही जागा कायम राखण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले. सत्तारूढ काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कारभाराला जनता कंटाळली असून त्यांना बदल हवा आहे. त्यामुळे आता गाफील राहू नका, कामाला लागा, असे आवाहन करून त्यांनी शिवसैनिकांमधील मरगळ झटकून काढण्याचा प्रयत्न केला. आढळरावांसाठी शिरूरचा रस्ता मोकळा असून ते कामालाही लागले आहेत. मावळात गजानन बाबर की सहसंपर्कप्रमुख श्रीरंग बारणे यांच्यापैकी कोणाला उमेदवारी, हा कळीचा मुद्दा आहे. पुन्हा उमेदवारी मिळण्याचा व निवडून येण्याचा बाबरांना विश्वास आहे. तर, गेल्या वेळी संधी हुकलेले बारणे सावध वाटचाल करताना दिसतात. लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांच्या नावाचा खडा टाकून चाचपणी करण्याचा प्रयोगही मावळात सुरू आहे. दोन्ही ठिकाणी सेनेला थेट राष्ट्रवादीशी सामना करायचा आहे. मागील वेळी मनसेचे उमेदवार रिंगणात नव्हते, त्याचा मोठा फायदा शिवसेनेला झाला होता. आताही मनसेसह काँग्रेस व भाजपची ऐन निवडणुकीतील भूमिका निर्णायक ठरणार आहे.

Story img Loader