दोन्हीकडील नेत्यांचा स्वतंत्र लढण्याचा मनोदय * खापर एकमेकांवर फोडणार
पिंपरी महापालिका निवडणुकीत बलाढय़ राष्ट्रवादीच्या विरोधात लढण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत युती होण्याची शक्यता आता धूसर होत चालली आहे. दोन्ही पक्षातील घडामोडी पाहता युती होऊच नये, असे प्रयत्न दोन्हीकडून होत असल्याची खात्रीशीर माहिती पुढे आली आहे. िपपरीत ही युती होण्यापूर्वीच तुटण्याच्या मार्गावर आहे. मात्र, त्याचे खापर एकमेकांवर फोडण्यासाठी दोन्हीकडील नेत्यांच्या ‘तोफा’ सज्ज झाल्या आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुढाकाराने सुरू झालेल्या युतीच्या नेत्यांमधील चर्चेची शेवटची बैठक शुक्रवारी (२० जानेवारी) वाकडला झाली. या वेळी भाजप ५८, शिवसेना ५५ व मित्र पक्ष १५ असा प्रस्ताव शिवसेनेचे संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे यांनी दिला. तथापि, तो भाजपला मान्य झाला नाही. पालकमंत्री गिरीश बापट यांच्याशी चर्चा करण्याचे कारण देऊन भाजपने वेळ मागून घेतली. दोन दिवसानंतर पुन्हा बैठक घेण्यात येईल, असे दोन्हीकडून सांगण्यात येत होते. मात्र, संयुक्त बैठक झालीच नाही. दोन्हीकडून चर्चेसाठी मनापासून कोणी पुढाकार घेत नव्हते. भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्या निवासस्थानी रविवारी बापट यांच्या उपस्थितीत विस्तृत चर्चा झाली. तेव्हा शिवसेनेचा प्रस्ताव अन्यायकारक आहे, यावर भाजप नेत्यांचे एकमत झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना ही सुधारित माहिती देण्याचे ठरले. दोघेही सोमवारी पुण्यात होते. या वेळी या विषयावरील चर्चा झाली असावी व युतीला ते अनुकूल नसावेत, असे संकेत आहेत.
पिंपरी-चिंचवडमध्ये आपली ताकद वाढल्याचा जास्तीचा आत्मविश्वास भाजपला आहे. तर, आमचा पाया भाजपपेक्षा जास्त भक्कम आहे, असे शिवसेनेचे म्हणणे आहे. त्यामुळे ५०-५० टक्के जागांचा फॉम्र्युला सर्वप्रथम चर्चेत आला होता. तो अमान्य झाला. नंतर, भाजपने ८८ जागांची मागणी केली, पुढे ती ५८ पर्यंत खाली आली. मग, मित्र पक्षांच्या जागांचा मुद्दा आला. जवळपास ३२ जागांवर दोघांनीही दावा केला. शिवसेनेचे अनंत कोऱ्हाळे, मारुती भापकर, भाजपच्या आशा शेंडगे यांच्या जागांवर कोणताच तोडगा निघत नव्हता. थेरगावमधील दोन प्रभागातील आठही जागा शिवसेनेला हव्या आहेत, त्यावरून चर्चेला खीळही बसली होती. भोसरी विधानसभेच्या ४६ पैकी ३२ जागांवर आमदार लांडगे यांनी दावा केला होता. अशा अनेक मुद्दय़ांवर युतीच्या चर्चेची गाडी अडली आहे.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने युतीसंदर्भात चर्चा झाली तरच तोडगा निघू शकतो, अन्यथा ही युती तुटण्याच्या मार्गावर आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात येते.
आमदार-पदाधिकाऱ्यांची बैठक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी पुण्यात एका खासगी कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी आमदार आणि शहर पदाधिकाऱ्यांची मुळीक पॅलेस येथे बैठक घेतली. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर त्यांनी शहरातील निवडणूक तयारीचा आढावा घेतला. पक्षाने आयोजित केलेले कार्यक्रम आणि भविष्यातील उपक्रमांची माहितीही त्यांनी घेतली.