कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या वेळी शिवसेना आणि भाजपामध्ये झालेला संघर्ष पाहता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी सेना-भाजपा वेगळे होऊ शकतात. कारण मुंबईवर वर्चस्व ठेवणे भाजपासाठी गरजेचे आहे, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी पुण्यात व्यक्त केले. काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या वेळी बोलताना चव्हाण म्हणाले, नुकत्याच झालेल्या दोन महानगरपालिका निवडणुकांच्या वेळी शिवसेना आणि भाजपा यांच्यात झालेला संघर्ष सर्व काही आलबेल नसल्याचेच दर्शवत आहे. राज्यात जरी युतीची सत्ता असली, तरी मुंबईचे महत्त्वाचे स्थान लक्षात घेता भाजपासाठी मुंबई महानगरपालिकेत सत्ता मिळणे गरजेचे आहे. त्याशिवाय संपूर्ण महाराष्ट्र ताब्यात येणार नाही. त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकांपूर्वी शिवसेना आणि भाजपा हे वेगळे होण्याची मोठी शक्यता आहे.
शरद पवार यांची भूमिका भाजपासाठी अनुकूल अशीच आहे, त्यामुळे शिवसेनेने जरी पाठिंबा काढला तरी सरकार सुरक्षित राहील, मात्र शरद पवार यांनी आपली भूमिका बदलल्यास चित्र निश्चितच वेगळे दिसेल. बारामती पॅटर्नचे मोदी आणि जेटली यांनी कौतुक केल्याच्या पाश्र्वभूमीवर ते म्हणाले, बारामती पॅटर्न हा चांगलाच आहे, मात्र तो देशभर राबवला जाणार का हा खरा प्रश्न आहे.
राज्यात डाळींचे भाव वाढण्यामागे राज्य सरकारची व्यापारीधार्जिणी भूमिका कारणीभूत असल्याचाही आरोप चव्हाण यांनी केला. सरकारने एप्रिलमध्ये डाळींच्या साठय़ाबाबतचे र्निबध अचानक काढले. परिणामी, व्यापाऱ्यांनी मोठय़ा प्रमाणावर साठेबाजी केली. त्यामुळे आता डाळींचे भाव वाढले आहेत. सरकारने या साठेबाजांची नावे जाहीर करावीत आणि त्यांच्यावर नेमकी काय कारवाई केली तसेच कोणाच्या सांगण्यावरून हे र्निबध काढले, हे देखील शासनाने सांगावे, अशीही मागणी चव्हाण यांनी या वेळी केली.
सध्या देशातील असहिष्णू वातावरण हे बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जाणीवपूर्वक निर्माण केले गेले आहे. संघ आणि भाजपा यांचा हा छुपा अजेंडा आहे. सहकारी मंत्री प्रक्षोभक वक्तव्ये करत असताना मोदी यांनी त्यांना समज देणे गरजेचे आहे, असेही चव्हाण म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा