पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीमध्ये खदखद असून भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे काही पदाधिकारी प्रचारापासून अलिप्त राहत असल्याने शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या कार्यकर्त्यांकडून दिल्लीतून भाजपचे सहा जणांचे पथक आल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात असे कोणतेही पथक आले नसल्याचे भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी सांगितले. त्यामुळे पथकाची अफवाच निघाली असून, महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारात उतरण्यासाठीच ही शक्कल लढविल्याचे दिसून आले.
मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारीवरून झालेली दावेदारी, आरोप-प्रत्यारोपांमुळे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मनापासून काम करतील की नाही, याची भीती महायुतीला सतावत आहे. त्यामुळेच महायुतीचे पदाधिकारी शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचे काम करत आहेत का, प्रचारात सक्रियपणे उतरलेत का, यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्याची बारकाईने माहिती घेण्याकरिता सहा जणांचे खास पथक दिल्लीहून मावळ लोकसभा मतदारसंघात दाखल झाल्याचे बारणे यांच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले. बारणे यांचे निकटवर्तीय असलेल्या भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांनीही याला दुजोरा दिला.
हेही वाचा >>> मावळमधील ‘वंचित’च्या उमेदवाराला नोटीस; काय आहे कारण?
पथक आल्याचे सांगण्यात आल्याने भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली. आमच्यावर विश्वास नाही का, म्हणत पदाधिकारी खासगीत नाराजी व्यक्त करू लागले. यावरून महायुतीत पुन्हा खदखद वाढल्याचे दिसून येते. दिल्लीचे पथक आले आणि गेले या चर्चेने महायुतीत संभ्रम वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
शंकर जगताप म्हणाले, की केंद्राचे कोणते पथक येणार असेल, तर राज्याला कळविले जाते. राज्याकडून जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांना कळविले जाते. मावळमध्ये असे कोणतेही पथक आले नाही. याबाबत मी श्रीरंग बारणे यांना विचारेन. महायुतीचे पदाधिकारी एकजुटीने प्रचार करत आहेत. कोणतेही पथक आले नाही. प्रत्येक पक्ष मते मिळविण्यासाठी प्रयत्न करत असतो. मित्रपक्ष शिवसेनेचे वरिष्ठ नेते शहरात येत आहेत. प्रचाराची माहिती घेत आहेत. राष्ट्रवादीचे पदाधिकारी बारणे यांचे काम करत असल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी सांगितले.