पिंपरी महापालिका व प्राधिकरणाकडून सुरू असलेली कारवाई एकतर्फी स्वरूपाची असून ज्यांना कुणी वाली नाही तसेच विरोधकांशी संबंधित अशीच बांधकामे पाडण्यात येत असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार गजानन बाबर व गटनेते श्रीरंग बारणे यांनी पत्रकार परिषदेत केला. चिखली कुदळवाडी भागात अनेक भंगार व्यावसायिकांनी उघडपणे अनधिकृत बांधकामे केली आहेत, तिकडे डोळेझाक का केली जाते, त्यांना घाबरता का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
पालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी तसेच प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी पावसाळ्यातही अनधिकृत बांधकामे पाडण्याची मोहीम सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले, त्यावरून शिवसेनेने टीका केली असून पावसाळ्यात कारवाई न करण्याची मागणी केली आहे. अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांनी अनेक निवडणुका लढवल्या. खोटी आश्वासने देऊन मतदारांची फसवणूक करून त्याजिंकल्या. आठवडय़ात अध्यादेश काढू, अशी घोषणा करून मुख्यमंत्रीही त्यात सहभागी झाले. पाडापाडी कारवाईच्या विरोधात काळेवाडी, थेरगाव येथे रास्ता रोको आंदोलन झाले, वाल्हेकरवाडीतही आंदोलन होणार असून राज्यशासनाचे अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी पिंपरी ते मुंबई पायी मोर्चा काढण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले. शास्तीकर हा जुलमी कर आहे, तो भरू नका, व्यापाऱ्यांनी एलबीटीचे पैसे भरू नये, असे आवाहन करून बांधकामांची वेळीच नोंदणी न करून नागरिकांची बांधकामे पाडण्यास कारणीभूत ठरलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. अनधिकृत बांधकामांवरील कारवाई व गुन्हे दाखल करण्याच्या प्रक्रियेमुळे पालिका अधिकारी व पोलिसांची पोटे भरली जात आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा