सारसबागेजवळ असलेल्या स्वा. सावरकर यांच्या पुतळ्यावर मेघडंबरी उभारावी तसेच पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठीही कायमस्वरूपी व्यवस्था योग्यप्रकारे करावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे मंगळवारी महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली.
शिवसेनेचे महापालिकेतील गटनेता अशोक हरणावळ तसेच उपशहर प्रमुख राजेंद्र शिंदे, विभाग प्रमुख बाळा ओसवाल आणि संतोष भुतकर यांनी या मागणीचे निवेदन आयुक्तांना सादर केले असून आवश्यक ती कामे न झाल्यास आंदोलनाचाही इशारा पक्षातर्फे देण्यात आला आहे. स्वा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मंगळवारी गेले होते. मात्र, पुतळ्याला हार अर्पण करता आला नाही. तशी कोणतीही व्यवस्था तेथे करण्यात आलेली नव्हती. पुष्पहार अर्पण करण्यासाठी आलेल्या अनेक सावरकरप्रेमींनाही असाच अनुभव तेथे येत होता. त्यामुळे अनेकांना केवळ पुतळ्याचे दर्शन घेऊन परतावे लागले.
याबाबत ‘लोकसत्ता’शी बोलताना अशोक हरणावळ म्हणाले, की पुतळा खराब होऊ नये तसेच त्याचे पावित्र्य राहावे, यासाठी पुतळ्यावर मेघडंबरी उभारण्यासाठी गेल्यावर्षीच तरतूद करण्यात आली होती. मात्र, ते काम वर्षांत होऊ शकले नाही आणि ती तरतूद संपुष्टात आली. या कामासाठी नव्याने निविदाप्रक्रिया करून तातडीने काम मार्गी लावावे, अशी मागणी आम्ही आयुक्तांकडे केली आहे. या ठिकाणी कायमस्वरूपी शिडी उभारण्याचीही गरज असून तेही काम करण्याची मागणी आम्ही केली आहे. पुतळा परिसरात एक चांगले ग्रंथालय आणि अभ्यासिका बांधण्याची योजना असून त्यासाठीही आम्ही प्रयत्न करत आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा