राज्यातील परिस्थिती पाहता मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता आहे. शिवसेना तयारीला लागली आहे. हिंमत असेल तर मध्यावधी निवडणुका लावाव्यात असे आव्हानच आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले. पिंपरी चिंचवड आणि भोसरी विधानसभा निहाय पदाधिकाऱ्यांची बैठक शनिवारी घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आता नवा अल्टिमेटम देणार नाही रोज आक्रमक पद्धतीने आठवण करून देत राहू असेही राऊत यांनी म्हटले.
महाराष्ट्रात कधीही निवडणुका होऊ शकतात, हे आम्ही नाही तर समोरचे लोक ठरवत आहेत; असे म्हणत राऊत यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपला लक्ष्य केले. तसेच अशा निवडणुका झाल्या तरीही आम्ही त्यासाठी सज्ज आहोत. राजकारणात शिवसेना कच्चा लिंबू नाही. ५० वर्षांपासून शिवसेना राजकारण करते आहे काल आलेल्या पक्षांनी आम्हाला शिकवू नये असाही टोला राऊत यांनी लगावला. ज्यांच्या विरोधात आम्ही लढलो त्यांच्या पाठिंब्याने सरकार स्थापणे अवघड नाही मात्र ती जनतेशी गद्दारी ठरेल. आत्ताच्या घडीला निवडणुका झाल्या तर आम्ही स्वबळावर जिंकून सत्तेवर येऊ असाही आत्मविश्वास राऊत यांनी व्यक्त केला.