दिल्लीत ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना दरम्यान ‘असे घडलो आम्ही’ या कार्यक्रमा दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की, एक पद मिळायचं, अस वादग्रस्त विधान शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी रविवारी केल.या विधानाच्या निषेधार्थ ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी पुण्यातील शिवाजीनगर भागातील मॉडेल कॉलनी येथील उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या निवासस्थाना बाहेर आंदोलन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्या सर्व घडामोडी दरम्यान मागील तीन दिवसाच्या कालावधीत ठाकरे आणि शिंदे गटातील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळाले. पण या दरम्यान नीलम गोऱ्हे यांनी कोणत्याही प्रकारची भूमिका मांडली नाही.या सर्व आरोप प्रत्यारोपावर नीलम गोऱ्हे काय भूमिका मांडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असताना,नीलम गोऱ्हे यांच्या समर्थनार्थ रोहिणी ठोंबरे या तरुणीने एक पोस्ट केली आहे.या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा चांगली सुरू आहे.

रोहिणी ठोंबरे या तरुणीने नीलम गोऱ्हे यांच्याबद्दल काय म्हटले आहे. ते पाहूयात….

नीलम गोऱ्हे यांच्याबद्दल आदर बाळगणारे आणि त्यांच्यावर टीका करणारे दोघेही असतील, हे स्वाभाविक आहे. मात्र, त्यांच्या आरोपांविषयी किंवा त्यांच्या प्रवासाविषयी चर्चेचा रोख त्यांच्या भूमिकेच्या गांभीर्याकडे असला पाहिजे,व्यक्तिनिष्ठ टीकेकडे नव्हे.

त्यांनी राजकीय कारकिर्दीत अनेक सामाजिक विषयांना वाचा फोडली आहे. महिला अत्याचार, स्त्रियांवरील अन्याय, बलात्कारासारख्या घटनांबाबत त्या सातत्याने आवाज उठवत राहिल्या आहेत. आज त्या ठाकरेंवर काही आरोप करतात, याचा अर्थ असा होत नाही की त्यांचा संपूर्ण प्रवासच संशयास्पद होता.

त्यांची भूमिका बदलली असेल, पण ते राजकारणाचे स्वरूप आहे. प्रत्येक राजकीय व्यक्ती वेळोवेळी आपल्या विचारसरणीत बदल करू शकते. आंबेडकरी चळवळीतून शिवसेनेत आल्या म्हणून त्यांची विश्वासार्हता डगमगते,असे म्हणणे अन्यायकारक ठरेल. अनेक आंबेडकरी विचारांचे लोक विविध पक्षांमध्ये गेले आहेत, कारण केवळ चळवळीपेक्षा प्रभावी अंमलबजावणी महत्त्वाची ठरते.

आंबेडकरी चळवळीमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली १९८४ ते १९९१ दरम्यान नीलम गोऱ्हे यांनी सरचिटणीस म्हणून काम केले. मात्र, राजकीय मतभेद झाल्याने त्या बाहेर पडल्या. त्यानंतर १९९८ मध्ये शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्या तब्बल 24 वर्षे म्हणजे २०२२ पर्यंत एकाच पक्षात राहिल्या.त्यामुळे ‘त्यांनी वारंवार पक्ष बदलले’ हा आरोप चुकीचा ठरतो. तसेच, त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कधीच नव्हत्या, हे स्पष्ट आहे.

त्यांच्यावर कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित असल्याचे आरोप केले जातात, मात्र वस्तुस्थिती अशी आहे की, त्या एसएफआय किंवा कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्य कधीच नव्हत्या. त्या युवक क्रांती दलात सक्रिय होत्या, मात्र हे संघटन स्वतंत्र होते. त्यामुळे अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी पसरवण्यापूर्वी सत्य तपासणे महत्त्वाचे आहे.

सत्तेत राहून काम करणे आणि सत्तेपासून दूर राहून टीका करणे – या दोन्ही गोष्टी वेगळ्या असतात. नीलमताईंनी शिवसेनेत राहून स्त्रियांसाठी केलेल्या कामाचे मोल नाकारता येणार नाही. त्या उपसभापती असताना महाराष्ट्रातील अनेक गंभीर प्रकरणांवर त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यामुळे आज त्या ठाकरे यांच्यावर बोलल्या म्हणून त्यांची पूर्वीची कर्तव्यनिष्ठा पुसून टाकता येणार नाही.

ठाकरेंवर त्यांनी केलेले आरोप हे राजकीय असतीलही, पण त्यांना एकतर्फी संधी मिळाली, हे म्हणणे चुकीचे आहे. सत्तेत असताना विरोधकांना उत्तर देण्याची ताकद असते, तसेच त्यांच्या वक्तव्यांना सामोरे जाण्याची जबाबदारीही असते.

‘त्या इतकी वर्षे गप्प का होत्या?’ हा प्रश्न योग्य, पण त्याला कारणं असू शकतात.

राजकारणात अनेकदा व्यक्तींना विशिष्ट काळानंतर बोलावे लागते. काही घटनांबद्दल बोलण्यासाठी योग्य वेळ लागतो. ज्या वेळी त्या शिवसेनेत होत्या, त्या वेळी पक्षाच्या अंतर्गत धोरणांवर बोलणे कठीण असते. ‘त्या पदे भोगत होत्या, मग आता बोलत आहेत’ हे म्हणणे सरसकट चुकीचे. जर कोणी सत्तेत राहून काही प्रश्न उपस्थित करत नसेल आणि बाहेर पडल्यावर सत्य सांगत असेल, तर त्याला दुहेरी भूमिकेचा आरोप लावणं सोपं आहे. पण मग राजकारणात असे अनेक लोक असतील, ज्यांनी पक्ष सोडल्यानंतर टीका केली आहे. त्यामुळे केवळ नीलम गोर्हे यांच्याबद्दल अशा टीका करणे योग्य नाही.