पुणे: पुणे शहरातील पत्रकार भवन येथे शिवसेनेत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा मेळावा आणि शिवसेना सदस्य नोंदणी अभियान उपक्रमाची सुरुवात शिवसेना नेत्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या पार पडली. या मेळाव्याला शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, महापालिकेचे प्रभाग कसे बदलतील,याबाबत आपल्याला माहिती नाही.पण प्रभाग बदलतील हा विचार करण्यापेक्षा आता ज्या ठिकाणी राहत आहात,त्या प्रभागात काम करणे आवश्यक आहे.नंतरच्या काळामध्ये युती होईल का नाही हा प्रश्न मला वाटत नाही.मुंबई आणि ठाण्यात नक्की युती होईल,त्यामुळे बाकीच्या ठिकाणी युती होण थोड अवघड आहे.जर युती झाली तर आपल्याला निश्चित आनंदच होईल,अशी भूमिका मांडत मुंबई,ठाणे वगळता,महायुती घटक पक्ष स्वबळावर लढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

तसेच त्या पुढे म्हणाल्या,एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यातील प्रत्येक भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी वेळ दिला आहे.त्या काळात झालेल्या मोर्चातील आंदोलनकर्त्यांची निवेदन त्यांनी स्वीकारली आणि तात्काळ आवश्यक त्या सूचना देण्याच काम त्यांनी केल आहे.त्यानंतर राज्यातील जनतेसाठी आनंदाचा शिधा,लाडकी बहिण योजनेसह अनेक योजना सुरू केल्या.त्या सर्व योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याच काम पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केले पाहिजे,असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

तसेच त्या पुढे म्हणाल्या,नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने आपल्या विश्वास ठेवून आपले 60 आमदार निवडून दिले आहेत.हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे.पण त्या निवडणुकीवेळी पुणे शहरात आपल्या वाट्याला जागा मिळाल्या नाही.यामुळे कार्यकर्त्यांमध्ये कमालीची नाराजी पाहण्यास मिळाली.तरी देखील शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर काम केले असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच त्या पुढे म्हणाल्या,येत्या काळात पुणे शहरातील विविध भागात शिवसेना सदस्य नोंदणी अभियान हाती घेण्यात येत आहे.त्याचाच एक भाग म्हणून 25 ते 27 एप्रिल दरम्यान लाल महाल,गुडलक चौक,एस.पी.कॉलेज चौक,वडगावशेरी भागात सदस्य नोंदणी अभियान राबवले जाणार आहे.त्याचबरोबर काही दिवसापूर्वी काहींचे पक्ष प्रवेश झाले आहेत आणि येत्या काळात अनेक जणांचे पक्ष प्रवेश होऊ शकतात. त्याबाबत तुम्ही काही काळजी करू नका आणि सर्वांना पदांमध्ये सामावून घेण्याची शक्ती ती केवळ शिवसेनेमध्ये आहे.तसेच प्रत्येकाला योग्य असे स्थान दिले जाईल,नवे आणि जुन्याचा मिलाफ करून कोणाला काय जबाबदार्‍या द्यायच्या,त्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक आराखडा तयार केला आहे.आपल्या सर्वांची नाव मी दिलेली आहेत. त्या संदर्भात येत्या १० ते १५ दिवसात निर्णय झाला पाहिजे,अशी खात्री वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.