मुंबई महापालिकेवर ताबा घेण्यासाठी निवडणूक तयारीच्या दृष्टीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना मुंबईत यावे लागते, हाच शिवसेनेचा नैतिक विजय आहे, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेतील विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी सोमवारी येथे दिली.
हेही वाचा >>> पुणे : आता मिळकतकराची आकारणी सदनिकांमधील सुविधांवर आधारित ?
विधान परिषदेत विरोधी पक्षनेते झाल्यानंतर प्रथमच पुणे दौऱ्यावर आलेल्या अंबादास दानवे यांनी गणेशोत्सवानिमित्त शहरातील काही प्रमुख सार्वजनिक मंडळांना भेट दिली. विधानपरिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे यांचीही त्यांनी भेट दिली. त्यानंतर पत्रकारांशी दानवे यांनी संवाद साधला.
दानवे म्हणाले, मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांकडून हल्ला झाला, असे सांगण्यात आले होते. त्या वेळी अनेकांना अटक झाली. मात्र, या दडपशाहीला आम्ही घाबरत नाही. शिवसेना जमिनीवरच असून ते आकाशात आहेत. आम्ही त्यांना चांगले आकाश दाखवू. शिवसेना फक्त निवडणुकीसाठी काम करत नाही. आम्ही जनतेसाठी काम करतो, त्यामुळे आमचा मुंबईत विजय होईल, यात शंका नाही.
हेही वाचा >>> पुणे : अकरावीच्या विशेष फेरीत २४ हजारांहून अधिक प्रवेश ; १७ हजार ६४१ विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीचे महाविद्यालय
सन १९६६ पासून शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे. या वर्षीही शिवाजी पार्कवर शिवसेनेचाच दसरा मेळावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली होईल, असे दानवे यांनी स्पष्ट केले.