पिंपरी : शिवसेना-भाजपमाध्ये उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार हे शुक्रवारी पिंपरी-चिंचवड महापालिकेत पहिल्यांदाच आले आहेत. सकाळी साडेदहा वाजल्यापासून महापालिका अधिकाऱ्यांसोबत शहरातील विकास कामांबाबत आढावा बैठक घेत आहेत. दरम्यान, शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, भाजपा आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे यांनी प्रशासनासोबतच्या बैठकीला पाठ फिरविल्याचे दिसून आले.
पिंपरी-चिंचवड शहरातील विकास कामांकडे अजित पवार यांचे बारकाईने लक्ष असते. शहरावर १५ वर्षे दादांचे एकहाती वर्चस्व होते. मात्र, २०१७ मध्ये भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसकडील सत्ता खेचून घेतली. तेव्हापासून पवार यांचे शहरावरील लक्ष कमी झाले होते. महाविकास आघाडीचे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असताना पवार यांनी पुन्हा शहरात लक्ष घातले होते. त्यांच्या सांगण्यानुसार प्रशासन निर्णय घेत होते. पण, ३० जून २०२२ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर पुन्हा शहराकडे पाठ फिरवली. आता शिवसेना-भाजपा सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पवार आज पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवडमध्ये आले आहेत. सकाळी साडेदहा वाजल्यापासून शहरातील विकास कामांचा आढावा घेत आहेत.
अजित पवार शहरात आले की शिवसेना, भाजपावर सडकून टीका करत होते. भाजपाच्या महापालिकेतील कारभारावर प्रश्न निर्माण करत होते. त्याला भाजपाकडूनही उत्तरे दिली जात होती. आता पवार शिवसेना-भाजपाच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनासोबत होणाऱ्या बैठकीला शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, भाजपा आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे हे उपस्थित राहतील, अशी शक्यता होती. पण, त्यांनी बैठकीकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, सर्व माजी नगरसेवक बैठकीला उपस्थित आहेत.