पुणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रारंभी स्वबळाची चाचपणी करणाऱ्या शिवसेनेने (शिंदे) सावध भूमिका घेऊन शहरातील ४० ते ५० जागांवर लक्ष केंद्रित केले आहे. हडपसर, पर्वती, वडगाव शेरी आणि सिंहगड रस्ता परिसरातील वाढती ताकद लक्षात घेऊन या भागांमधून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याच्या दृष्टीने शहर शिवसेनेचे नियोजन सुरू झाले आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर शहरातील सर्वच पक्षांनी महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. महापालिका निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून लढविली जाणार, की युती-आघाडीमधील पक्ष स्वबळावर लढणार, हे अद्यापही स्पष्ट झाले नाही. मात्र, शिवसेनेकडून शहरातील आठही विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका सुरू करण्यात आल्या आहेत. त्या अंतर्गत शहरातील ४० ते ५० जागांवर पहिल्या टप्प्यात महायुतीमधील शिवसेनेकडून लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यानुसार शहरप्रमुख प्रमोद ऊर्फ नाना भानगिरे यांच्या अध्यक्षतेखाली हडपसर विधानसभा मतदारसंघाची बैठक झाली.
हे ही वाचा… पाच माजी नगरसेवक करणार मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश; पुण्यात शिवसेना ठाकरे पक्षाला धक्का
महापालिका निवडणुकीसाठी संघटनबांधणी, पक्षाची ध्येयधोरणे आणि महायुती म्हणून राज्य सरकारची कामे आणि योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचे या बैठकीत निश्चित करण्यात आले. हडपसर, पर्वती, वडगाव शेरीसह खडकवासला मतदारसंघांतर्गत येत असलेल्या सिंहगड रस्ता परिसरात शिवसेनेची ताकद वाढली आहे. त्यामुळे या भागातून जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून येतील, या दृष्टीने नियोजन सुरू करण्यात आले आहे.
महायुतीने उपमुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक लढविली. ‘लाडकी बहीण’सारख्या विविध योजना राबविल्या. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा झाला. त्यामुळे या सर्व योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यालाही शिवसेनेकडून प्राधान्य देण्यात आले आहे.
महापालिका निवडणुकीसाठी योजना प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचविण्यात येतील. निवडणूक तयारीच्या दृष्टीने काही भागांवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून, तेथून जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील, यासाठी प्रयत्न केले जातील. – नाना भानगिरे, शहरप्रमुख, शिवसेना