शहरात दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी काही रस्त्यांवर पार्किंग शुल्क आकारणीबाबत महापालिकेने तयारी सुरू केली असली, तरी शहरात दुचाकी वाहनांना कोणतेही पार्किंग शुल्क आकारले जाऊ नये, अशी मागणी शिवसेकडून पालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
प्रमुख रस्त्यांवर दुचाकींसाठी पार्किंग शुल्क आकारणीचा प्रस्ताव यापूर्वी महापालिकेत वादग्रस्त ठरला होता. तसा प्रस्ताव महापालिकेच्या मुख्य सभेपुढे मंजुरासाठी आल्यानंतर तो मुख्य सभेने एकमताने फेटाळलाही होता. शहरात चारचाकी वाहनांसाठी काही रस्त्यांवर पार्किंग शुल्क आकारले जात होते. त्या ठेक्याची मुदत संपल्यामुळे पुन्हा जाहिरात काढण्यात आली असून त्या अनुषंगाने शिवसेनेचे उपशहर प्रमुख संजय मोरे तसेच किशोर ननावरे, उत्तम भुजबळ, सनी गवते आणि वीरेंद्र गायकवाड यांनी महापालिका प्रशासनाला एक निवेदन दिले आहे.
ज्या रस्त्यांवर महापालिका ठेकेदारी पद्धतीने पार्किंग शुल्काची आकारणी करणार आहे, त्या रस्त्यांवरील निम्मी जागा दुचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी असली पाहिजे, ती जागा दिसेल अशा पद्धतीने तेथे थर्मोप्लॉस्टचे पट्टे मारलेले असले पाहिजेत आणि दुचाकींना तेथे मोफत पार्किंग असले पाहिजे, अशी शिवसेनेची मागणी आहे. पहिल्या तासासाठी पाच रुपये व पुढील दहा तासांसाठी १५ रुपये असा दर महापालिकेने निश्चित केला असला, तरी त्यात बदल करून पहिल्या चार तासांसाठी पाच रुपये व पुढील दहा तासांसाठी १५ रुपये असे शुल्क चारचाकी वाहनांकडून आकारावे अशीही मागणी करण्यात आली आहे.

Story img Loader