पिंपरी : राज्यातील सत्ता समीकरणे बदलल्यानंतर आता मावळ लोकसभा मतदारसंघातील परिस्थितीही बदलू शकते. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर मावळमधून पुन्हा पार्थ पवार यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे शिंदे गटात गेलेले मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांची मात्र चांगलीच अडचण झाली आहे.
लोकसभा मतदारसंघाची २००९ मध्ये पुनर्रचना झाली. या पुनर्रचनेत पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड, मावळ विधानसभा आणि रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत, उरण या तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश करत मावळ लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली आहे. शहरी, ग्रामीण भागाचा या मतदारसंघात समावेश आहे. मावळमधून २०१९ मध्ये अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांनी लोकसभेची निवडणूक लढविली होती. मात्र, पार्थ यांचा तब्बल दोन लाख १५ हजार ९१३ मतांनी दारुण पराभव झाला. शरद पवार यांचा पार्थ यांच्या उमेदवारीला विरोध असतानाही उमेदवारी दिली होती. पार्थ यांच्या भवितव्याची त्यांच्या आई सुनेत्रा पवार यांना चिंता असल्याचे सांगितले जाते. त्यांच्या आग्रहामुळेच २०१९ मध्ये उमेदवारी दिली होती, अशीही चर्चा आहे.
शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी पवार घराण्यातील पहिल्या सदस्याचा पराभव केला होता. बारणे आणि अजित पवार यांचे राजकीय वैर सुरुवातीपासूनच आहे. २०१९ नंतर त्यामध्ये वाढ झाली. आता राज्यातील समीकरणे बदलली आहेत. अजित पवार हे शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले आहेत. पवार यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्रिपद येण्याची दाट शक्यता आहे. मावळमध्ये येत असलेल्या पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे, मावळचे आमदार सुनील शेळके यांच्यासह बहुतांश पदाधिकारी पवार यांच्यासोबत आहेत. रायगडमध्ये राजकीय ताकद असलेले सुनील तटकरे हे अजित पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. त्यामुळे मावळच्या जागेवर पवार गटाचा प्रबळ दावा राहण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>>अकरावी ऑनलाइन प्रवेशाची तिसरी फेरी उद्यापासून, गुणवत्ता यादी १२ जुलैला
भाजपसोबत असल्याने पार्थ हे सहज दिल्लीला जातील, असे अजित पवार यांना वाटत आहे. भाजप नेते, उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पवार यांचे घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे पार्थ यांना मावळातून उमेदवारी देण्याबाबत फडणवीस देखील अनुकूल भूमिका घेऊ शकतात.मावळमधून २०२४ मध्ये आपणच उमेदवार असल्याचा दावा खासदार श्रीरंग बारणे यांनी काही दिवसांपूर्वीच केला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघ कोणाला मिळणार, कोण उमेदवार असणार याचा निर्णय घेताना शिंदे-फडणवीस-पवार सरकारची कसोटी लागणार आहे.