पिंपरी- चिंचवड : पंतप्रधानांच्या उज्वला गॅस योजनेत केंद्र सरकार ने ५० रुपयांनी दरवाढ केल्याने शिवसेना ठाकरे गटाकडून निषेध करण्यात आला आहे. पिंपरी च्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात शिवसेना ठाकरे गटाकडून निषेध करण्यात आला. चुलीवर भाकरी थापून अनोख आंदोलन करण्यात आलं. मोदी सरकार हाय – हाय च्या जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी ठाकरे गटाचे संजोग वाघेरे यांच्यासह इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
यावेळी संजोग वाघेरे म्हणाले, आमच्या महिला भगिनींना दरवाढीचा सामना करावा लागतो. या दरवाढीचा आम्ही निषेध करत आहोत. चुलीवर भाकरी बनवून महिला कार्यकर्त्यांनी याचा निषेध केला आहे. मोदींनी सांगितलं होतं अच्छे दिन आले आहेत. महिलांना चुलीवर स्वयंपाक करण्याची गरज नाही. उज्वला योजना आणली. पण, ५० रुपयांनी या योजनेत दरवाढ केल्याने महिलांमध्ये नाराजी आहे.
एकीकडे महिलांबाबत सहानुभूती दाखवता आणि दुसरीकडे महिलांकडून पैसे उकळत आहेत. असा आरोप संजोग वाघेरे यांनी केला आहे. केंद्र सरकार चा आम्ही निषेध करत आहोत. लवकरात लवकर दरवाढ मागे घ्या अन्यथा यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संजोग वाघेरे यांनी दिला आहे. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी देखील तीव्र शब्दात मोदी सरकार चा निषेध केला आहे.