“दोन दिवसांपूर्वी मुंबईतल्या सभेत बोललो की, एक तर तू राहशील किंवा मी राहिल. माझ्या पायाशी कलिंगड ठेवलेलं होतं. त्यामुळे काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं. मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही. मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण? याची संकल्पना उद्धव ठाकरे यांनी सांगितली. मी म्हणजे माझा संस्कारी महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावर दरोडे टाकणाऱ्या दरोडेखोरांचा पक्ष. ढेकणाला कधी आव्हान दिलं जात नाही, ढेकणं चिरडायची असतात. कुणीतरी हे आव्हान स्वतःवर घेतलं. त्यानं सांगितलं माझ्या नादाला लागू नका. मी म्हणतो, तुझ्या नादाला लागण्याएवढ्या किंमतीचा तू नाहीच आहेस”, अशी टीका शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज पुण्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपन्न झाला. यावेळी त्यांनी भाजपावर पुन्हा एकदा टीकास्र सोडले. “बऱ्याच वर्षांनंतर मी पुण्यात येत आहे. यापुढे लढाई मैदानात होणार, हॉलमध्ये होणार नाही”, असेही आव्हान त्यांनी यावेळी दिले.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, काही दिवसांपूर्वी पुण्यात भाजपाचा एक कार्यक्रम झाला. इतिहासात आपण डोकावलं, तर शाहिस्तेखान जरा तरी हुशार होता, असं म्हणावं लागेल. त्याचं बोटावर निभावलं. तीन बोटं कापली गेल्यानंतर पुन्हा महाराष्ट्रात नाही आला. त्यातनं काही शहाणपण यांनी घेतले असते तर परत महाराष्ट्रात आले नसते, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षरित्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली.

“पण ते (अमित शाह) परत का आले? तर महाराष्ट्राच्या जनतेने दिलेल्या फटक्यांचे वळ कुणाकुणाच्या अंगावर उमटले. हे पाहण्यासाठी ते आले. अहमदशाह अब्दालीचा राजकीय वंशज हा पुण्यात आला होता. तो अहमद शाह होता आणि हे अमित शाह आहेत. अहमद शाहचा राजकीय वशंच इथे वळवळायला आला होता. नवाज शरीफचा केक खाणाऱ्यांकडून आता आम्ही हिंदुत्व शिकायचं का? शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याचे हे म्हणाले. आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. शं‍कराचार्यांनी म्हटल्याप्रमाणे विश्वासघातकी लोक हिंदू असू शकत नाही. तुम्ही आमच्याशी विश्वासघात केला”, असे टीकास्र उद्धव ठाकरेंनी सोडलं.

आम्ही काँग्रेसशी आघाडी केली तर हिंदू विरोधी होतो का? मग तुमचे राजकीय बाप श्यामाप्रसाद मुखर्जी मुस्लीम लीगबरोबर मांडीला मांडी लावून का बसले होते? जम्मू-काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांच्याबरोबर सरकार स्थापन केले होते. आजही चंद्राबाबू नायडू यांच्याशी आघाडी केली. नायडू हे काय हिंदुत्ववादी आहेत का? नितीश कुमार हिंदुत्ववादी आहेत का? त्यांच्याकडे डोळेझाक करून आमच्यावर टीका करता, असाही सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

बातमी अपडेट होत आहे…

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena ubt leader uddhav thackeray again criticized devendra fadnavis in pune rally kvg