लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : लोकसभेच्या ‘मिशन-४८’साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसंकल्प अभियानाची घोषणा केली असून जिल्ह्यातील शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघातून या अभियानाला शनिवारपासून प्रारंभ होणार आहे. शिवसंकल्प अभियानाच्या निमित्ताने मुख्यमंत्री शिंदे यांचे प्रचार मेळावे होणार असून यानिमित्ताने लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे. राज्यातील लोकसभेच्या ४८ जागा पूर्ण ताकदीनिशी लढवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
शिवसंकल्प अभियानाच्या पार्श्वभूमीवर शहर पदाधिकाऱ्यांची नियोजनाची बैठक गुरुवारी झाली. शहर प्रमुख नाना भानगिरे, पुणे लोकसभा निरीक्षक किशोर भोसले, जिल्हा प्रमुख रमेश कोंडे, युवासेना सचिव किरण साळी, युवासेनेचे जिल्हा प्रमुख निलेश घारे, सहसंपर्क प्रमुख अविनाश खेडेकर, महिला आघाडी शहर प्रमुख पूजा रावेतकर यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडी आणि अंगिकृत संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. शिवदूत, बुथप्रमुख इथपासून ते शहरप्रमुखांपर्यंत नव्या जोमाने कामाला लागून, पक्षाला नव्याने उभारी देण्यासाठी आणि नव्या उमेदीने पक्ष बांधणी करून, पक्ष वाढीस हातभार लावण्याची सूचना यावेळी करण्यात आली.
आणखी वाचा-संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट शिष्यवृत्ती द्या! नितीन गडकरी यांचे चंद्रकांत पाटील यांना पत्र
शिवसंकल्प अभियानाचे प्रचार मेळावे दोन टप्प्यात पार पडणार असून त्यातील पहिला टप्पा ६ जानेवारी रोजी शिरूर येथून सुरू होणार असून ११ जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथील सभेने पहिल्या टप्प्यातील प्रचार दौरा पूर्ण होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात २५ जानेवारीपासून पुन्हा प्रचार मेळाव्यांना सुरूवात होणार असून या दिवशी शिर्डी येथे दुसरा प्रचार मेळावा पार पडेल, तर या प्रचार मेळाव्यांचा समारोप ३० जानेवारी रोजी हातकणंगले येथे होईल. प्रचार मेळाव्यांच्या समारोपासह कोल्हापूर येथे दोन दिवसीय विशेष महाशिबिराचे आयोजन करण्यात येणार असून त्यानंतर या शिवसंकल्प अभियानाची सांगता होणार आहे.