लोकसभेसाठी भारतीय जनता पक्षाने तयार केलेल्या ‘व्हीजन २७२ प्लस’ प्रमाणे शिवसेनेचीही लोकसभेसाठी तयारी सुरू झाली असून या निवडणुकीत १९ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठरवण्यात आल्याची माहिती, शिवसेनेचे नवनियुक्त पुणे जिल्हा संपर्क प्रमुख गजानन कीर्तिकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
शिवसेनेचे नेते कीर्तिकर यांची पुण्याच्या संपर्कप्रमुखपदी नुकतीच नियुक्ती झाली असून नियुक्तीनंतर त्यांनी शनिवारी पदाधिकाऱ्यांची बैठक शिवसेनेच्या कार्यालयात घेतली. आमदार महादेव बाबर, उपशहरप्रमुख प्रशांत बधे, गटनेता अशोक हरणावळ, तसेच अजय भोसले आदींची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना कीर्तिकर म्हणाले की, गेल्या काही काळात पक्षात आलेली मरगळ दूर करण्याचे काम तातडीने सुरू केले जाणार आहे. त्यासाठी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, काही पदाधिकाऱ्यांचे बदल, कार्यकर्त्यांचे मेळावे आणि पुणेकरांच्या प्रश्नांवर आंदोलन अशा पद्धतीचा कार्यक्रम असेल.
आगामी लोकसभेसाठी भाजपने नुकतेच व्हीजन २७२ प्लस जाहीर केले असून त्यानुसार तयारी सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. लोकसभेसाठी शिवसेनेची व्यूहरचना काय आहे, या प्रश्नावर कीर्तिकर म्हणाले की, आम्ही देखील तयारी सुरू केली आहे. आम्ही १९ जागांचे लक्ष्य ठेवले आहे. उमेदवार निवडताना चूक होऊ नये यासाठी आतापासूनच काम सुरू झाले असून योग्य ती माहिती सर्व ठिकाणांहून गोळा केली जात आहे. पक्षाने पहिल्या टप्प्यात बूथ प्रमुखांच्या नियुक्तीवर लक्ष केंद्रित केले असून शत प्रतिशत बूथ प्रमुख नियुक्त करण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर बूथ प्रमुखांचे मतदारसंघनिहाय मेळावे आणि नंतर जनतेसमोर जाण्याची तयारी, अशा पद्धतीचे नियोजन आहे.
शहर व जिल्ह्य़ात मिळून २१ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातील सात जागांवर युतीचे आमदार आहेत. आगामी निवडणुकीत ही संख्या १५ करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, असेही कीर्तिकर यांनी सांगितले.
दोन शहर प्रमुखांची नियुक्ती करणार
पुणे शिवसेनेतील शहर प्रमुख हे पद दोन वर्षे रिक्त आहे. या पदाऐवजी विधानसभा मतदारसंघनिहाय प्रमुख नेमले जाण्याची शक्यता होती. याबाबत कीर्तिकर यांना विचारले असता ते म्हणाले की, शहर प्रमुख पदाची आवश्यकता आहे आणि ते आम्ही तत्त्वत: मान्यही केले आहे. त्यानुसार नियुक्ती केली जाईल. मात्र, शहराचा विस्तार लक्षात घेऊन एकाऐवजी दोन शहर प्रमुख नियुक्त केले जाणार आहेत.

Story img Loader