‘‘स्वत:च्या नावाने राज्य उभे करणारे घटक आजही समाजात पाहायला मिळतात; पण मरगळलेल्या आणि गलितगात्र झालेल्या समाजामध्ये शक्ती निर्माण करून छत्रपती शिवाजीमहाराजांनी जे राज्य निर्माण केले ते भोसल्यांचे राज्य नव्हते, तर ते हिंदवी स्वराज्य होते, ’’ असे प्रतिपादन कृषिमंत्री शरद पवार यांनी शुक्रवारी केले. हा संदर्भ गांधी-नेहरू घराण्यासाठी होता, हे पवार यांनी ती नावे न घेताही उपस्थितांच्या सहजच लक्षात आले.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी- एनडीए) पुणे महापालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या शिवाजीमहाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण पवार यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले; या वेळी ते बोलत होते. एअर मार्शल के. एस. गिल आणि महापौर वैशाली बनकर यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.
मराठी भूमीत परकीयांचे राज्य होते. येथील समाज गलितगात्र आणि नेतृत्वहीन झालेला होता. अशा समाजाचे स्वराज्याचे स्वप्न शिवरायांनी साकार केले, या समाजामध्ये सामूहिक शक्ती निर्माण केली आणि येथे राज्य उभे केले. त्या काळातील राज्ये त्या त्या राजांच्या नावांनी ओळखली जात होती. येथे यादवांचे राज्य होते, मुघलांचे राज्य होते. शिवाजीमहाराजांनी मात्र येथे रयतेचे राज्य निर्माण केले, हिंदूवी स्वराज्य निर्माण केले. त्यांचे राज्य हे भोसल्यांचे राज्य नव्हते, तर ते हिंदवी स्वराज्य होते, असे सांगून पवार म्हणाले की, स्वत:च्या नावाने राज्य उभे करणारे घटक आजही समाजात पाहायला मिळतात; पण छत्रपतींनी उभे केलेले राज्य रयतेचे राज्य होते. पवार यांनी दिलेला हा संदर्भ आणि केलेली सूचक टिप्पणी गांधी-नेहरू घराण्यासाठी होती, हे उपस्थितांच्या सहजपणे लक्षात आले.
‘‘एनडीएमधील प्रत्येक प्रशिक्षणार्थी आणि अधिकारी येथून बाहेर पडताना शिवरायांच्या जीवनापासून प्रेरणा घेतल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्यापासून फक्त युद्धकौशल्यच शिकायचे नाही, तर राज्य कसे चालवावे, लोकांशी कसे वागावे, प्रशासन कसे असावे या गोष्टीही त्यांच्यापासून शिकण्यासारख्या आहेत,’’ असेही पवार यांनी सांगितले.
‘‘मराठी राज्याची स्थापना करणारे शिवाजीमहाराज हे मराठी गौरवाचे, शौर्याचे आणि वीरतेचे प्रतीक होते. त्यांचा पुतळा एनडीएमध्ये उभारण्यात आला, ही गौरवाची गोष्ट आहे. शिवाजीमहाराज केवळ महाराष्ट्रासाठीच नाहीत, तर भारतवासीयांसाठी प्रेरणादायी आहेत,’’ असे के. एस. गिल म्हणाले. महापौर वैशाली बनकर यांनी प्रास्ताविक, सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले.