दोन प्रकाशकांच्या न्यायालयीन लढाईमध्ये ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत यांच्या साहित्य प्रकाशनावरील र्निबध दूर झाले आहेत. त्यामुळे मराठी साहित्यामध्ये मैलाचा दगड ठरलेल्या आणि गेली साडेचार दशके वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या ‘मृत्युंजय’ या कादंबरीची नवी आवृत्ती येत्या महिनाअखेरीस ‘मेहता पब्लिशिंग हाउस’तर्फे बाजारामध्ये येणार आहे.
महाभारतातील कर्ण या उपेक्षित व्यक्तिरेखेला नायकत्व बहाल करणाऱ्या मृत्युंजय या कादंबरीने शिवाजी सावंत हे नाव मराठी साहित्याला परिचित झाले. महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मीकी ग. दि. माडगूळकर यांच्या शिफासरीवरून कॉन्टिनेन्टल प्रकाशनचे अनंतराव कुलकर्णी यांनी ‘मृत्युंजय’ कादंबरी प्रकाशित केली आणि १९६७ मध्ये दस्तुरखुद्द गदिमांच्याच हस्ते या कादंबरीचे प्रकाशन झाले होते. या कादंबरीवरूनच शिवाजी सावंत यांना ‘मृत्युंजय’कार अशी ओळख प्राप्त झाली. गेल्या ४५ वर्षांत या कादंबरीच्या २७ आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. शिवाजी सावंत यांच्या निधनानंतर त्यांच्या साहित्याचे हक्क पत्नी मृणालिनी, मुलगा अमिताभ आणि कन्या कादंबरी धारप यांच्याकडे आले. अमिताभ सावंत यांनी २०१२ मध्ये मेहता पब्लिशिंग हाउसचे सुनील मेहता यांना मृत्युंजयकारांच्या साहित्य प्रकाशनाचे हक्क दिले होते. त्यानंतर कॉन्टिनेन्टल प्रकाशनने जिल्हा सत्र न्यायालयामध्ये धाव घेतली.
यासंदर्भात मेहता यांच्यातर्फे बाजू मांडणाऱ्या अॅड. कल्याणी पाठक म्हणाल्या, कॉन्टिनेन्टल प्रकाशनने आब्रिट्रेशन क्लॉजअंतर्गत या संदर्भात योग्य सल्ला येईपर्यंत मेहता पब्लिशिंग हाउसला साहित्य प्रकाशन करण्यास स्थगिती मागितली होती. मात्र, याप्रकरणी आर्बिट्रेशनचा क्लॉज लागू होत नाही असे सांगत न्यायालयाने कॉन्टिनेन्टलचा अर्ज फेटाळला. त्यानंतर या प्रकाशनाने उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली. या प्रकरणातील तीन मुद्दय़ांचा ऊहापोह झालेला नाही याकडे लक्ष वेधत उच्च न्यायालयाने हे प्रकरण पुन्हा एकदा जिल्हा आणि सत्र न्यायालयाकडे पाठविले. मात्र, साहित्य प्रकाशित करण्यावरील स्थगिती उठवली असल्यामुळे हे साहित्य प्रकाशन करण्याचा मार्ग खुला झाला आहे.
या संदर्भात जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये नव्याने दाद मागण्यात येणार असल्याचे कॉन्टिनेन्टल प्रकाशनच्या देवयानी कुलकर्णी-अभ्यंकर यांनी सांगितले.
 नवी आवृत्ती महिनाअखेरीस बाजारात
मेहता पब्लिशिंग हाउसचे सुनील मेहता म्हणाले, शिवाजी सावंत यांच्या साहित्य प्रकाशनावरील स्थगिती संपुष्टात आल्याने ‘मृत्युंजय’ची नवी आवृत्ती येत्या महिनाअखेरीस वाचकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रसिद्ध चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांनी नव्या आवृत्तीसाठी मुखपृष्ठ केले आहे. सध्या बाजारात मृत्युंजय ४५० रुपयांना असलेली ही कादंबरी आता केवळ ३०० रुपयांना दिली जाणार आहे. १५ हजारांच्या आवृत्तीपैकी साडेचार हजार प्रतींची नोंदणी झाली आहे. ‘मृत्युंजय’ नंतर ‘छावा’ आणि ‘युगंधर’ या शिवाजी सावंत यांच्या कादंबरी मार्चअखेरीस वाचकांना उपलब्ध होतील.

Story img Loader