Maharashtra Assembly Election 2024 : शिवाजीनगरमध्ये भाजपचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या मताधिक्यात मोठी वाढ

शिवाजीनगर मतदारसंघात महायुतीकडून भारतीय जनता पक्षाचे सिद्धार्थ शिरोळे, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे दत्ता बहिरट यांच्यात प्रमुख लढत होती.

shivajinagar assembly election results 2024 news in marathi
भाजपचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे photo credti : facebook

पुणे : शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी ३६ हजार ७०२ मतांनी विजय मिळवला. या मतदारसंघात वाढलेल्या मतटक्क्याचे लाभार्थी सिद्धार्थ शिरोळेच ठरल्याचे दिसून येत आहे. लाडकी बहीण योजना, मतदारांशी साधलेला संपर्क, केलेली विकासकामे अशा कारणांमुळे शिरोळे यांचे २०१९च्या निवडणुकीच्या तुलनेत मताधिक्य मोठ्या प्रमाणात वाढले आहे. 

शिवाजीनगर मतदारसंघात महायुतीकडून भारतीय जनता पक्षाचे सिद्धार्थ शिरोळे, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे दत्ता बहिरट यांच्यात प्रमुख लढत होती. काँग्रेसचे मनीष आनंद यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली. निकालात सिद्धार्थ शिरोळे यांनी ८४ हजार ६९५ मतांसह ३६ हजार ७०२ मतांनी विजय मिळवला. काँग्रेसचे दत्ता बहिरट यांना ४७ हजार ९९३ मते मिळाली. मनीष आनंद यांना १३ हजार ६१ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे परेश सिरसांगे यांना २ हजार २४४, बहुजन समाज पक्षाचे लतीफ शेख यांना ८४६ मते मिळवता आली. या मतदारसंघात यंदा सुमारे सात टक्के मतदान वाढले होते. सिद्धार्थ शिरोळे २०१९मध्ये सुमारे पाच हजार मतांनी विजयी झाले होते.

हेही वाचा >>> Chinchwad and Maval Vidhan Sabha : चर्चा तर होणारच; भाजपचे शंकर जगताप १ लाख, तर सुनील शेळके १ लाख ८ हजारांच्या मताधिक्याने विजयी

मनीष आनंद यांच्या बंडखोरीचा फटका दत्ता बहिरट यांना बसण्याची शक्यता वर्तवली जात होती. आनंद यांनी काही हजार मते मिळवली असली, तरी आनंद यांनी मिळवलेल्या मतांपेक्षा शिरोळे यांचे मताधिक्य जास्त आहे. त्यामुळे आनंद यांच्या या बंडखोरीचा फटका बहिरट यांना बसल्याचे दिसून येत नाही. मात्र, ही बंडखोरी पथ्यावर पडून शिरोळे यांना मोठे मताधिक्य मिळवणे सुकर झाल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा >>> ‘ईव्हीएम’विरोधात सर्वोच्च न्यायालयात; पराभवानंतर वडगाव शेरीतील उमेदवार आक्रमक

माझ्यावर विश्वास दाखवून मला पुन्हा संधी दिल्याबद्दल मतदारांचे आभार. हा विजय केवळ माझा नाही, तर प्रत्येक मतदार, अव्याहतपणे काम केलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे. या विजयाने जबाबदारीचीही जाणीव करून दिली आहे. आता अधिक काम करून शिवाजीनगर विकास आणि समृद्धतेचे प्रारूप म्हणून विकसित करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी भावना भाजपचे सिद्धार्थ शिरोळे यांनी व्यक्त केली.

ठळक वैशिष्ट्ये

– मतदारसंघात वाढलेले मतदान

– काँग्रेसमधील बंडखोरीचा फारसा परिणाम नाही

– झोपडपट्टी भागातील विकासकामे, लाडकी बहीण योजना पथ्यावर – मतदारसंघातील भाजपची ताकत स्पष्ट

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shivajinagar assembly election results 2024 bjp candidate siddharth shirole vote share increased pune print news ccp 14 zws

First published on: 23-11-2024 at 19:48 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या