पुणे : मेट्रो प्रकल्पाअंतर्गत पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या भूमिगत मेट्रो मार्गिकेअंतर्गत काम पूर्ण होणारे शिवाजीनगर हे पहिले स्थानक ठरणार आहे. या भूमिगत मेट्रो स्थानकाचे ८५ टक्के काम पूर्ण झाले असून शिवाजीनगर परिसरात एकात्मिक बहुउद्देशीय वाहतूक केंद्र नियोजित आहे. शिवाजीनगर रेल्वे स्थानक, पीएमपी, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ आणि हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचा या बहुउद्देशीय वाहतूक केंद्रात समावेश आहे. येत्या महिनाभरात ही उर्वरित कामे पूर्ण होणार आहेत.दरम्यान, शिवाजीनगर येथील महामेट्रोचे काम पूर्ण झाले असले, तरी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून एसटीचे वाकडेवाडी येथील आगार बहुउद्देशीय वाहतूक केंद्रात आणण्यास टाळाटाळ केली जात आहे.
मेट्रो प्रकल्पाच्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मेेट्रो मार्गिकेअंतर्गत शेतकी महाविद्यालय ते स्वारगेट ही जवळपास सहा किलोमीटर लांबीची मार्गिका भूमिगत आहे. मेट्रो, पीएमआरडीएची शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो, एसटी, रेल्वे आणि पीएमपी या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांसाठी शिवाजीनगर येथे बहुउद्देशीय वाहतूक केंद्र प्रस्तावित करण्यात आले आहे. या कामाचा पाहणी दौरा सोमवारी महामेट्रोकडून आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी येत्या महिनाभरात शिवाजीनगर मेट्रो स्थानकाचे काम पूर्ण होईल, अशी माहिती मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डाॅ. ब्रिजेश दीक्षित यांनी दिली. भूमिगत मेट्रो मार्गिकेतील काम पूर्ण होणारे शिवाजीनगर हे पहिले स्थानक ठरणार आहे.
शिवाजीनगर भूमिगत मेट्रो स्थानक मुख्य रस्त्यापासून २०० मीटर अंतरावर आहे. साखर संकुल ते आकाशवाणी या रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्याखाली त्याची उभारणी करण्यात आली आहे. आकाशवाणी, शिवाजीनगर रेल्वे स्थानक आणि जुना-मुंबई-पुणे महामार्ग जोडण्यासाठी पादचारी भुयारी मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी दोन स्वतंत्र भुयारी मार्ग आहेत. एक भुयारी मार्ग शिवाजीनगर रेल्वे स्थानकाकडे तर दुसरा डाॅ. कपोते जंक्शनकडे जाण्यासाठी वापरता येणार आहे. या स्थानकात एकूण पाच लिफ्ट असून त्यापैकी तीन लिफ्टचे काम पूर्ण झाले आहे. १२ सरकते जिने असून त्यापैकी ६ जिन्यांची कामे झाली आहेत, असे ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले.
हेही वाचा : विश्लेषण : जिथे कमी तिथे मोदी? भाजपची लोकसभेसाठी काय आहे रणनीती?
दरम्यान, महामेट्रोकडून बहुउद्देशीय वाहतूक केंद्राचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ही जागा एसटी महामंडळाच्या मालकीची असल्याने त्यांनी त्यांच्या योजनेनुसार हा भूखंड विकसित करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे मेट्रोने शिवाजीनगर येथे काम पूर्ण केले. भूमिगत मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर शिवाजीनगर येथील जागा एसटी महामंडळाला पुन्हा हस्तांतरीत केली जाणार आहे. मात्र काम पूर्ण झाल्यानंतरही शिवाजीनगर बहुउद्देशीय वाहतूक केंद्रात एसटीचा समावेश होण्याबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे. वाकडेवाडी येथूनच एसटी आगाराचे काम करण्यात येणार आहे. शिवाजीनगर येथील जागेवर आगार स्थलांतरित करण्याचा निर्णय धोरणात्मक आहे. राज्य शासनाने निर्णय दिल्यानंतरच स्थलांतर केले जाईल, असा दावा एसटी महामंडळाकडून करण्यात आला आहे.