पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत (पीएमआरडीए) शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यान नियोजित मेट्रो सावर्जनिक, खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वानुसार साकारण्यात येत आहे. भविष्यात हिंजवडी आणि खराडी आयटी पार्क एकमेकांना जोडण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे पुणे आयटीसीटी मेट्रो रेल लिमिटेडच्या संचालक नेहा पंडित यांनी सांगितले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या ८५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंडित बोलत होत्या. या वेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनीत भावे, पुणे पत्रकार प्रतिष्ठानाचे अध्यक्ष शैलेश काळे, सरचिटणीस मीनाक्षी गुरव, कार्यवाह गजेंद्र बडे, खजिनदार शिवाजी शिंदे उपस्थित होते. ‘पुण्यातील आयटी क्षेत्र आणि मध्यवर्ती भागाला जोडणारी मेट्रो, आव्हाने आणि संधी’ या विषयावर त्यांनी विचार मांडले. या वेळी पुणे पत्रकार संघाच्या नवीन संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले.
हेही वाचा – पुणे : दुचाकीवरील महिलेकडील चार लाखांचे दागिने चोरले, आळंदी रस्त्यावरील घटना
पंडित म्हणाल्या, ‘एखादा प्रकल्प उभारण्यापूर्वी प्रथम नागरिकांचे हित, भौगोलिक परिस्थिती, आर्थिक क्षमता आदी गुणसूत्र एकत्र जुळवून अभ्यास केला जातो. विशेषत: ज्या ठिकाणी प्रकल्प मंजूर झाला, तो प्रकल्प उभारण्यासाठी प्रथम भूसंपादन महत्त्वाचे असते. सरकारी नियमानुसार ९० टक्के भूसंपादन झाल्यानंतरच प्रकल्पाच्या पायाभरणीच्या कामाला सुरुवात होते. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत (पीएमआरडीए) शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यान नियोजित मेट्रो सार्वजनिक, खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वानुसार साकारण्यात येत आहे. त्यासाठी जर्मनमधील एक खासगी कंपनीही सहयोगी आहे. तब्बल सात हजार कोटींच्या माध्यमातून हा प्रकल्प साकारण्यात येत आहे. भविष्यात हिंजवडी आणि खराडी आयटी पार्क जोडण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.’
शहर आणि उपनगरात मेट्रोचे जाळे दिवसेंदिवस विस्तारत आहे. प्रवासी हा मुख्य केंद्रबिंदू डोळ्यांसमोर ठेवून मेट्रोकडून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मेट्रोत नव्याने सुधारणा करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी सुलभ आणि सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने मेट्रोने प्रवास करण्यास प्राधान्य दिले, तरच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील मेट्रो सक्षम होईल, असे पंडित यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – पुणे : शहरात दोन ठिकाणी आगीच्या घटना, वारजे भागातील आगीत अग्निशमन दलाचा जवान जखमी
‘परदेशात अजूनही ‘रिमोटसेन्सिंग’ आधारित मेट्रो चालविल्या जातात. मात्र, आपल्याकडे स्वयंचलित मेट्रो सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच ‘थर्ड रेल’ तंत्रज्ञानाद्वारे विद्युतवाहक तारांचे जंजाळ दूर करून थेट अतिउच्च दाबाच्या विद्युत प्रवाहावर या मेट्रो चालविण्यात येत आहेत. मेट्रो सुविधेचा लाभ घेताना प्रवाशांना मेट्रोचे दरवाजे, प्रवाशांना बाहेरील दृश्य पाहण्यासाठी अर्धवट काचेऐवजी पूर्ण काचांची खिडकी, काचेचे दरवाजे आदी सुविधा देऊन मेट्रोची रचना साकारण्यात आली आहे, असे पंडित यांनी सांगितले.