पुणे : पुण्यासह राज्यातील इतर शहरांमध्ये मध्ये रेकी करून आणि वेशांतर करत भर दुपारी घरफोड्या करणाऱ्या सराईत घरफोड्याला शिवाजीनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तपासामध्ये पन्नासहून अधिक घरफोड्या उघड झाल्या असून वेगवेगळ्या प्रकारच्या ४९ किल्ल्यांसह त्याच्याकडून १७ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.हर्षद गुलाब पवार (वय ३१, रा. गुलाबनगर, घोटावडे फाटा, मुळशी) असे या अट्टल चोराचे नाव आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल यांनी गुरुवारी दिली. सहायक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत या वेळी उपस्थित होते.  

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेल्या वर्षी एका घरफोडी प्रकरणात गुन्हा दाखल होता. ४ फेब्रुवारी रोजी शिवाजीनगर पोलिसांचे पथक गस्त घालत असताना चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी हा म्हसोबा गेट बस थांबा येथे थांबल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सापळा लावून हर्षद पवार याला पोलिसांना ताब्यात घेतले. त्याच्याजवळ असलेल्या सॅकची तपासणी केली असता, त्यात सोन्या-चांदीचे दागिने आढळले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत अन्य ठिकाणी देखील रेकी करून घरफोड्या केल्याचे सांगितले.याप्रकरणी हर्षदला अटक केल्यानंतर, चौकशीत त्याच्याकडून शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत तीन, वारजे माळवाडी हद्दीत तीन, खडक हद्दीत दोन, विमानतळ हद्दीत दोन तर चंदननगर, बावधन आणि आळंदी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रत्येकी एक अशा १३ घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले.

वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर सावंत, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी, सहायक पोलीस निरीक्षक संजय पांढरे, राजकुमार केंद्रे, उपनिरीक्षक अजित बडे, पोलीस हवालदार रूपेश वाघमारे, भाऊ चव्हाण, राजकिरण पचार, महावीर कलटे, सचिन जाधव, आदेश चलवादी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कारागृहातून बाहेर आल्यानंतर पुन्हा घरफोड्या

हर्षद पवार याला २०२३ मध्ये न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर त्याने पुन्हा घरफोड्या करण्यास सुरूवात केली. त्यापूर्वीच्या पोलीस तपासात हर्षद पवार याने पुणे, पिंपरी-चिंचवड यासह पुणे जिल्ह्यात ५१ घरफोड्या केल्याची माहिती समोर आली आहे.. पोलिसांनी त्याच्याकडून सोन्याचे दागिने, चांदी, घरफोडी करण्यासाठी वापरत असलेली कटावणी, स्क्रू ड्रायव्हर यासह वेगवेगळ्या कुलुपांच्या ४९ किल्ल्या असा १७ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Story img Loader