पुणे : शिवाजीनर-लोणावळा लोकल सेवा आता दुपारच्या वेळेतही सुरू राहणार आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या दुपारच्या लोकलला बुधवारी हिरवा झेंडा दाखविला. यामुळे आता या मार्गावरील प्रवाशांची सोय होणार आहे. याआधी या मार्गावर दुपारी तीन तास लोहमार्गांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी ही सेवा बंद ठेवली जात होती.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे लोणावळा स्थानकावरून गाडीला हिरवा झेंडा दाखविला. पुणे विभागाचे अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेशकुमार सिंह, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ.मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय अभियंता मनीषकुमार सिंह आणि मुंबई विभागाचे अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमरेंद्र सिंह उपस्थित होते.
हेही वाचा >>>Pune : फक्त ६० रुपयांची पुण्यातील ही मिसळ खाल्ली आहे का? व्हिडीओ होतोय व्हायरल
पुणे-लोणावळा दरम्यान लोकलच्या दिवसभरात ४० फेऱ्या होतात. या लोकलने दररोज ६० हजार प्रवासी प्रवास करतात. पुणे-लोणावळा लोकल सेवा सकाळी ११.१५ ते दुपारी ३ या काळात तर लोणावळा-पुणे लोकल सेवा सकाळी १० ते दुपारी २.५० या कालावधीत बंद ठेवली जात होती. यामुळे दुपारी या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत होती. त्यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांचा समावेश होता. महाविद्यालये दुपारी सुटतात अशा विद्यार्थ्यांना लोकलसाठी काही तास स्थानकावर प्रतीक्षा करीत थांबावे लागत होते अथवा इतर पर्यायांचा प्रवासासाठी वापर करावा लागत होता. आता त्यांची दुपारच्या लोकलमुळे प्रवासाची सोय होणार आहे.
हेही वाचा >>>एमपीएससीकडून उमेदवारांवर कारवाईचा बडगा, गैरवर्तनामुळे उमेदवार झाले प्रतिरोधित
लोणावळा, कर्जतमध्ये दोन गाड्यांना थांबा
याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – चेन्नई एग्मोर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या एक्स्प्रेसला लोणावळा स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- भुवनेश्वर -छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या कोनार्क एक्स्प्रेसला कर्जत स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
अशा आहेत दोन नवीन लोकल
शिवाजीनगर ते लोणावळा
दुपारी १२.०५ वाजता सुटून १.२० वाजता पोहोचणार
लोणावळा ते शिवाजीनगर
दुपारी ११.३० वाजता सुटून १२.४५ वाजता पोहोचणार