“तुमची लेणी बघायला कुत्रंही येत नाही,” असे वादग्रस्त विधान शिवसेनेचे शिरुरमधील माजी खासदार आणि विद्यमान उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केलं आहे. जुन्नरमधील लेण्याद्री येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे स्थानिक गावकरी, लेणी अभ्यासक आणि इतिहासतज्ज्ञांनी नाराजी व्यक्त केली आहे.

काय आहे प्रकरण?

लेण्याद्री येथील अष्टविनायक गणपतींपैकी एक असणाऱ्या लेण्याद्रीच्या दर्शनसाठी विनाशुल्क प्रवेश देण्यात यावा, अशी स्थानिकांची मागणी आहे. यासाठी त्यांनी उपोषणही सुरु केलं आहे. शनिवारी याच उपोषणकर्त्यांना भेटण्यासाठी आढळराव लेण्याद्रीला आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मात्र त्यावेळीस त्यांनी एक वादग्रस्त विधान केलं. त्यांच्या या विधानाचा व्हिडिओ तालुक्यामध्ये व्हायरल झाला आहे.

काय म्हणाले आढळराव?

लेण्याद्रीच्या दर्शनासाठी पैसे आकारण्यात येऊ नये अशी भूमिका आढळराव यांनी मांडली. लेण्याद्रीच्या डोंगरांमध्ये पुरातन लेणी असल्याने येथे येणाऱ्या भाविकांकडून पुरातत्व विभागाकडून प्रवेशशुल्क आकारण्यात येते. याला स्थानिकांचा विरोध आहे. स्थानिकांची बाजू मांडाताना आढळराव यांनी, “आमचं सगळ्याचं म्हणजेच ग्रामस्थ, देवस्थान असेल किंवा आमच्या तालुक्यातील सगळी जनता असेल सर्वांच असं म्हणणं आहे की लेणी बघायला कोणी येत नाही. मी तर गेल्यावेळी त्यांना म्हणालो होतो तुमची लेणी बघायला कुत्रीपण येत नाहीत. आम्हाला फक्त देवस्थानला जाण्यासाठी पैसे खर्च करावे लागतात हे चूक आहे. पैसे खर्च करुन देवस्थानचं दर्शन घ्यायचं असं कुठचं नाहीय भारतामध्ये. ही बाब डायरेक्टर जनरलसहीत सर्वांनी मान्य केली होती. मंत्र्यांनाही मान्य केली होती,” असं मत नोंदवलं. आढळराव यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटलं आहे.

जुन्नरला लेण्यांचा वारसा

देशामधील सर्वाधिक लेणी समूह असणाऱ्या जुन्नर तालुक्यामधील लेण्याद्री हे गणपतीचे देवस्थान अष्टविनायकांपैकी एक आहे. नाणेघाटाबरोबरच वेगवेगळ्या किल्ल्यांमुळे जुन्नर तालुक्याला लेण्यांचा वैभवशाली वारसा आहे. देशविदेशातून लेणी अभ्यासक येथील लेणी पाहण्यासाठी येतात. या लेण्यांची अवस्था सध्या बिकट झाली असून काही ठिकाणी पडझड झाली असली तरी इतिहासप्रेमी आवर्जून या लेण्यांना भेट देतात. असं असतानाच दुसरीकडे आढळराव यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने जिल्ह्यातील लेणी अभ्यासकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आढळराव यांचे स्पष्टीकरण

आढळराव यांच्या वक्तव्यावरुन वाद झाल्यानंतर त्यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. उपोषणकर्त्यांची भेट घेण्यास आपण गेलो होतो तेव्हा तेथील अधिकाऱ्यांशी आपण चर्चा केल्याची माहिती आढळराव यांनी दिली. “लेण्याद्रीला येणारे ९९ टक्के लोकं देवदर्शनासाठी तर एक टक्का लोक लेणी पाहण्यासाठी येतात असं अधिकाऱ्यांबरोबरच्या चर्चेतून समजलं. यावेळी बोलताना मी बोली भाषेत ते शब्द वापरले होते. त्यामुळे कोणाच्याही भावना दुखवण्याचा माझा हेतू नव्हता. भाविकांना मदत करण्यासाठी मी या प्रश्नावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच दृष्टीने अधिकाऱ्यांशी माझी चर्चा झाली,” असं आढळराव या प्रकरणाबद्दल स्पष्टीकरण देताना म्हणाले.