राज्याच्या राजकारणात तर्कवितर्क आणि चर्चांना उधाण आलं आहे. कधी कोणता नेता कुणासोबत जाईल याची चर्चा होईल याचा अंदाज नाही. कधी अजित पवार भाजपाबरोबर जाणार असल्याच्या चर्चा होतात, कधी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चा होतात, तर कधी राष्ट्रवादी काँग्रेसच भाजपाबरोबर जाणार असल्याचे तर्कवितर्क लावले जातात. या पार्श्वभूमीवर माजी खासदार आणि शिवसेना (शिंदे गट) नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, “अमोल कोल्हे भाजपात आले, तर चांगलीच गोष्ट आहे. आमच्या दृष्टीने शिवसेना-भाजपा युती वाढणं महत्त्वाचं आहे. अमोल कोल्हे कोणत्या मतदारसंघातून उभे राहतात त्यावर मी त्यांचा प्रचार करणं अवलंबून आहे.”
“ते आले तर चांगलंच आहे”
संजय शिरसाट यांनी अजित पवार गट करून आले, तर चालेल म्हणाले. मात्र, संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष भाजपाबरोबर येणार असेल, तर आम्ही बाहेर पडू, असंही त्यांनी नमूद केलं. याबाबत विचारलं असता आढळराव म्हणाले, “ती गोष्ट तशी होईल की नाही हे अद्याप माहिती नाही. त्यामुळे ते आले तर चांगलंच आहे. शिरसाट काय म्हणतात यापेक्षा तशी शक्यता असेल तर चांगलं आहे.”
“राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा एकत्र आले, तर तुमच्या शिवसेनेचं काय होईल?”
“राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा एकत्र आले, तर तुमच्या शिवसेनेचं काय होईल?” असा प्रश्न विचारला गेल्यानंतर आढळराव म्हणाले, “असं होईल असं मला वाटत नाही आणि झालं तर शिवसेना शिवसेना आहे. एकनाथ शिंदेंची स्वतःची ताकद आहे. भाजपा आम्हाला सोडून असं काही करेल असं वाटत नाही. आम्ही सगळे एक आहोत. झालं तरी आम्हाला काही अडचण नाही.”
हेही वाचा : शरद पवार यांनी तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्ष केलं तर होणार का? अजित पवार स्पष्टच म्हणाले…
“अखंड राष्ट्रवादी येईल असं वाटत नाही”
“अजित पवार भाजपाबरोबर येतील अशी चर्चा सुरू आहे. अखंड राष्ट्रवादी येईल असं वाटत नाही. शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपा एकत्र आले तर चांगलंच होईल,” असंही आढळरावांनी नमूद केलं.