लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : शासकीय सेवेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्पर्धा परीक्षार्थी वर्षानुवर्षे धडपडत असताना पुण्याच्या शिवांश जागडे या बावीस वर्षीय उमेदवाराने नागरी सेवा परीक्षा २०२४मध्ये देशात २६वा क्रमांक पटकावत पहिल्याच प्रयत्न यश मिळवले आहे. विशेष म्हणजे, गणित विषयातील पदवीधर असलेल्या शिवांशने कोणीतीही शिकवणी न लावता केवळ स्वयंअध्ययनाच्या जोरावर ही कामगिरी केली आहे.
यूपीएससीने नागरी सेवा परीक्षा २०२४चा निकाल जाहीर केला. त्यात राज्यातील उमेदवारांनी लक्षणीय यश मिळवले आहे. मूळचा पानशेत जवळच्या रुळे या गावचा असलेल्या शिवांशला सरकारी सेवेची कौटुंबिक पार्श्वभूमी नाही. त्याच्या आई-वडील शेती-व्यवसाय करतात. शिवांशचे शालेय शिक्षण पुण्यातच झाले. त्यानंतर त्याने फर्ग्युसन महाविद्यालयातून २०२३मध्ये गणित विषयात पदवी संपादन केली. पदवीच्या पहिल्या वर्षाला असतानाच त्याने स्पर्धा परीक्षा देऊन शासकीय सेवेचे स्वप्न पाहिले. त्यानंतर आवश्यक ती तयारी करण्यास शिवांशने सुरुवात केली.
देशात २६वा क्रमांक मिळाल्याचा आनंद शिवांशने व्यक्त केला. ‘पदवीच्या पहिल्या वर्षीच यूपीएससीचे स्वप्न पाहून अभ्यासाला सुरुवात केली. कोणतीही शिकवणी लावली नाही. संपूर्णपणे स्वयंअध्ययन केले. यूपीएससीसाठी गणित हाच विषय निवडला होता. त्यामुळे तयारी करणे थोडे सोपे गेले. दिवसातील पंधरा-सोळा तास अभ्यास करत होतो. ‘आयएएस’ होण्याचे स्वप्न पहिल्याच प्रयत्नात साध्य झाले आहे. माझ्या या यशामुळे कुटुंबीय अतिशय आनंदात आहेत. माझ्या यशात त्यांचाही मोठा वाटा आहे. त्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे हे यश शक्य झाले,’ अशी भावना शिवांशने व्यक्त केली.