लोकसत्ता वार्ताहर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नारायणगाव : शिवजयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर आज, बुधवारी (१९ फेब्रुवारी) विविध कार्यक्रम होणार असून, पारंपरिक शिवजन्म सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली जाणार आहे. तसेच यंदा शिवभक्तांना किल्ल्यावर प्रवेशपत्राविना प्रवेश मिळणार असल्याचे किल्ले शिवनेरी शिवजयंती महाउत्सव समितीचे निमंत्रक व आमदार शरद सोनावणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

शिवजयंतीनिमित्त कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार उपस्थित राहणार आहेत. ‘पारंपरिक शिवजन्म सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना या वेळी देण्यात येणार आहे. तसेच, बुधवारी सकाळी दहा ते दुपारी चार या कालावधीत शिवकालीन मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक सादर करण्यासाठी प्रमुख पथकांना निमंत्रित करण्यात आले आहे. सायंकाळी पाच वाजता पर्यटनमंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती होणार असून यंदा शिवभक्तांना किल्ल्यावरील प्रवेशासाठी प्रवेशपत्राची आवश्यकता भासणार नाही. सर्व शिवभक्तांना किल्ल्यावर प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती आमदार शरद सोनावणे यांनी यावेळी दिली.

पत्रकार परिषदेला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे, सूरज वाजगे, शिवसेना (शिंदे) शहरप्रमुख अविनाश कर्डिले, माजी नगरसेवक श्याम खोत, विक्रम परदेशी, संध्या भगत उपस्थित होते.

यंदाचे प्रमुख आकर्षण

शिवजयंतीनिमित्त जुन्नर शहरातील परदेशपुरा चौक, तसेच छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे उभारण्यात येणारे छत्रपती अंबारी त्रिमितीय प्रवेशद्वार, तसेच शिवकालीन शौर्य मावळा प्रवेशद्वार यंदाच्या शिवजयंतीचे प्रमुख आकर्षण ठरणार असून शिवभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.

प्रमुख रस्त्यांवर पाच महाद्वार उभारण्याचा प्रस्ताव

दरम्यान, शिवनेरी किल्ल्यावर रज्जू मार्ग (रोप-वे), जुन्नर तालुक्यातील खेतेपठार, तसेच बोरघरमार्गे भीमाशंकरला जोडणारा रस्ता, आंबेगव्हाण येथील बिबट्या सफारी पार्क, जुन्नर तालुक्यात प्रवेश करणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर पाच महाद्वार उभारण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात येणार असल्याचे शरद सोनावणे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivneri fort shivaji maharaj jayanti entrance ssb