कर्नाटक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी करत शिवसैनिक आज (१९ डिसेंबर) पुण्यात थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटले. त्यांनी निवेदन देत दोषींवर कारवाईची मागणी केली. यावर अमित शाह यांनी शिवसैनिकांचं निवेदन स्वीकारत त्यांची भूमिका स्पष्ट केली. “या प्रकरणात मी लक्ष घातले आहे. माझे उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे झाले आहे,” असं अमित शाह यांनी शिवसेना कार्यकर्त्यांना सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमित शाह म्हणाले, “या प्रकरणात मी लक्ष घातले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत माझे बोलणे झाले आहे. दोषींवर कारवाई होईल.”

शिवसेना पुणे शहर प्रमुख संजय मोरे, किरण साळी आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी पुणे दौर्‍यावर असलेल्या गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. तसेच या प्रकरणातील दोषींवर कारवाईची मागणी केली. अमित शाह यांनी देखील शिवसेनेच्या शिष्टमंडळाकडून निवेदन स्वीकारत कारवाईचं आश्वासन दिलं. याबाबत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली.

शिवसैनिकांनी अमित शाह यांना दिलेलं निवेदन

शिवसैनिकांच्या निवेदनाचं पान क्र. १
शिवसैनिकांच्या निवेदनाचं पान क्र. २

हेही वाचा : “ सत्तेसाठी हिंदुत्वाशी समझोता केला अन् दोन पिढ्यांपासून ज्यांच्याशी लढत होते त्यांच्याच मांडीवर जाऊन बसले ”

“छत्रपतींचा अवमान; कानडी अत्याचाराची नरेंद्र मोदींनी दखल घ्यावी”

“छत्रपती शिवाजी महाराज केवळ आमचेच नाहीत, तर सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही. कर्नाटकातील मराठी जनतेवरील कानडी अत्याचार थांबवून या हिणकस आणि विकृत मनोवृत्तीचा बिमोड करण्यासाठी पंतप्रधानांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वतः यात लक्ष घालावे आणि तेथील राज्य शासनाला त्वरित संबंधितांवर कडक कारवाई करण्यास सांगावे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

उद्धव ठाकरे म्हणाले, “बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत अघटित घडले आहे, तर त्याची कसून चौकशी करायलाच हवी. या प्रकाराकडे डोळेझाक करू नका. गेली कित्येक वर्ष कर्नाटकातील मराठी बांधवांवर अत्याचार केला जात आहे आणि आता तर शिवरायांसारख्या आपल्या आराध्य दैवताची विटंबना करण्याची घटना घडते आणि तेथील सरकार याकडे डोळेझाक करते हे दुर्दैवी आहे.”

“भाजप शासित कर्नाटकात शिवरायांची विटंबना आणि कुणावरही कारवाई नाही”

“नुकतेच वाराणसीत काशी विश्वेश्वराच्या मंदिरात पंतप्रधानांनी आपल्या भाषणात ‘देशाची संस्कृती चिरडण्याचा जेव्हा जेव्हा प्रयत्न झाला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांसारखे पराक्रमी राजे निर्माण झाले’ असे कौतुकोद्गार काढले होते. या कार्यक्रमास काही दिवस झाले नाही तोच, भाजप शासित कर्नाटकात याच शिवरायांची विटंबना होते आणि कुणावर कारवाई न करता उलट मराठी माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो हे अतिशय निंदनीय आणि अवमानकारक आहे,” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

“पंतप्रधानांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने कारवाईचे आदेश द्यावेत”

“राज्यात कुणाचेही सरकार असो पण दैवते बदलत नाहीत. हा कानडी अत्याचार बंद करण्यासाठी आता पंतप्रधानांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने तेथील राज्य सरकारला आदेश द्यावेत व या विकृत मनोवृत्तीचा बिमोड करण्यास सांगावे,” अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींकडे केली आहे.

“भ्याड प्रकार थांबविण्याऐवजी त्याला खतपाणी घालायचे हे चालणार नाही”

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “बेळगावात मराठी भाषिकांच्या गळचेपी करायची. सनदशीर मार्गाने सीमाप्रश्नी लढा देत असलेल्या मराठी भाषिकांवर कन्नड कर्मठांकडून हल्ला करायचे. असे भ्याड प्रकार थांबविण्याऐवजी त्याला खतपाणी घालायचे हे चालणार नाही. छत्रपतींचे नाव केवळ राजकारणासाठी घ्यायचे आणि आमच्या दैवताचा अनादर झाल्यावर मात्र बोटचेपी भूमिका घ्यायची. हे कदापिही खपवून घेतले जाणार नाही.”

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena activist meet amit shah in pune over shivaji maharaj insult issue pbs
Show comments