मुंबईत नाइट लाइफला राज्य मंत्रीमंडळाकडून मंजुरी देण्यात आली आहे. राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी २७ जानेवारीपासून अंमलबजावणीला सुरुवात होईल अशी माहिती पत्रकार परिषदेदरम्यान दिली आहे. यावेळी त्यांना मुंबईप्रमाणे पुण्यातही नाइट लाइफ सुरु करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी पुण्यात आधी आफ्टरनून लाइफ सुरु करतोय असं उत्तर देताच एकच हशा पिकला.

दरम्यान यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी नाइट लाइफमुळे पोलिसांवर कोणताही ताण येणार नाही असं सांगितलं. “नाइट लाइफ म्हणजे फक्त पब आणि बार नाही. पब आणि बार यांना नवे नियम लागू राहणार नसून ते रात्री दीड वाजेपर्यंतच सुरू राहिल. जीआर न वाचणारे टीका करत आहेत. या निर्णयामुळे पोलिसांवर कोणताही ताण येणार नाही,” असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे.

“रोजगार निर्मिती आणि महसूल वाढवण्याबरोबर लोकांना २४ तास सेवा मिळावी या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे. नाइट लाइफ म्हणजे केवळ पब आणि बार इतकंच नसेल. बार आणि पबसाठी महसूलचे निर्णय आहेत. त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. अनेक लोक नाइट शिफ्टला काम करतात. रात्री दहा वाजल्यानंतर भूक लागली तर कुठे जायचं हा प्रश्न असतो. शॉपिंग करता येत नाही, चित्रपटही पाहता येत नाही. मुंबईचा महसूल वाढवायचा असेल तर हे होणं गरजेचं आहे. हॉटेल्स, दुकाने आणि मॉल्स २४ तास सुरू राहतील. यात २४ तास दुकानं सुरू ठेवणे बंधनकारक नाही. हे प्रत्येकावर अवलंबून असेल,” असं आदित्य ठाकरे म्हणाले.

राज्य मंत्रीमंडळाची मंजुरी मिळाल्याने मुंबईत अनिवासी भागातील सर्व थिएटर, मॉल्स, रेस्टॉरंटस् 24 तास खुले ठेवण्यास परवानगी दिली जाणार आहे. नरिमन पॉईंट, काला घोडा, बीकेसी, कमला मिल अशा मुंबईतील अनिवासी भागात नाईट लाईफ सुरु होणार आहे.

Story img Loader