मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क मैदानात झालेल्या मेळाव्यात आक्रमक हिंदूत्वाची भूमिका मांडतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर यथेच्छ टीका केली होती. शरद पवारांनी १९९९मध्ये राष्ट्रवादीची स्थापना केल्यापासूनच राज्यात जातीपातीचे राजकारण सुरू झाल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी केला होता. राज ठाकरेंच्या सभेवर बोलताना पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही मनसेवर टीका करत ही भाजपाची सी टीम असल्याचं म्हटलं होतं.
दरम्यान आदित्य ठाकरेंनी पुण्यात पर्यायी इंधन परिषदेच्या समारोपाच्या कार्यक्रमात उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. संजय राऊतांवर ईडीने केलेल्या कारवाईबद्दल बोलताना त्यांनी राजकीय हेतूने कारवाई होत असल्याचं स्पष्ट दिसत असून सूडाच्या राजकारणाची भावना घेऊन हे सर्व सुरु असल्याची टीका केली. तसंच .देशात जे काही सुरु आहे ते लोकशाहीचं, राजकीय वातावरण नसून दबावशाहीचं राजकारण आहे असंही म्हटलं.
दरम्यान यावेळी त्यांना मनसेला भाजपाची सी टीम म्हटल्यासंबंधी विचारलं असता त्यांनी माझं जास्त काही बोलणं नाही, संपलेल्या विषयावर जास्त बोलायचं नसतं असं सांगत भाष्य करणं टाळलं.
काय म्हणाले होते आदित्य ठाकरे –
साम टीव्हीच्या कार्यक्रमात बोलताना आदित्य ठाकरे यांनी मनसे म्हणजे भाजपाची सी टीम असल्याचा उल्लेख केला होता. तसंच टाइमपास टोळीला काम मिळालं हे पाहून बरं वाटलं असा टोलाही लगावला होता. जो पक्ष गेली इतकी वर्ष आपली भूमिका स्पष्ट करु शकला नाही त्यांच्याकडे किती लक्ष द्यायचं याचा विचार केला पाहिजे असंही ते म्हणाले होते.
संजय राऊतांची संपत्ती ईडीने जप्त केल्यानंतर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “अशा धमक्या…”
“आमचं हिंदुत्व वचनं पूर्ण करण्याचं आणि सेवा करण्याचं आहे. मनसेला मी टाइमपास टोळी म्हणायचो कारण ते टाइमपासच करायचे. पण आता मला बरं वाटतंय की भाजपाची सी टीम म्हणून त्यांना थोडं काम मिळालं आहे. बी टीम एमआयएम आहे आणि सी टीम मनसे आहे,” असं आदित्य ठाकरे म्हणाले होते.
“भाजपाचं राजकारण पाहिलंत तर ज्या राज्यात सत्ता हवी आहे तिथे या दोन्ही पक्षांना वापरुन, एकमेकांविरोधात बोलून, काही घटना घडवून, हिंदू मुस्लिम दंगली घडवून सरकार स्थापन कसं करायचं याकडे लक्ष दिसत आहे,” असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला होता.
“जो पक्ष गेली इतकी वर्ष आपली भूमिका स्पष्ट करु शकला नाही त्यांच्याकडे किती लक्ष द्यायचं. कुठेही आपल्या राज्यात वाद वाढू नयेत, संवादानी पुढे जावं यासाठी महाराष्ट्राने लक्ष दिलं पाहिजे,” असा सल्ला आदित्य ठाकरेंनी दिला. तसंच हिंदुत्वासाठी सतत लढण्याची गरज नसते. राजकीय पक्ष म्हणून जी वचनं देतो ती पूर्ण करणंही हिंदुत्व आहे असंही उत्तर राज ठाकरेंना दिलं.
राज ठाकरे अयोध्येला जाण्यासंबंधी विचारलं असता त्यांना सांगितलं की, “अयोध्येतील संघर्ष संपला आहे. कोर्टाने निर्णय दिला आहे. शिवसेना अयोध्येला गेल्यानंतर कोर्टाचा निकाल आला आणि मंदिर उभं राहत आहे. मंदिर उभं राहिल्यानंतर दर्शनाला कोणीही जाऊ शकतं”.