राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून राजकीय संघर्ष पहायला मिळत असून, आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा वारंवार एकनाथ शिंदे गटाकडून केला जात आहे. हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला असला, तरी अद्याप त्यावर कोणताही निर्णय आलेला नाही. यादरम्यान दोन्ही बाजूंनी आपला दावा भक्कम करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. यादरम्यान, पुण्यातील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या बॅनरची चर्चा रंगली आहे. या बॅनरवर उद्धव ठाकरेंसोबत बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचेही फोटो लावण्यात आले आहेत.
बंड पुकारल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांकडून वारंवार बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा उल्लेख केला जात आहे. बाळासाहेबांनी दिलेली शिकवण आणि आनंद दिघे यांच्या विचारावर आपण वाटचाल करत असल्याचं त्यांच्याकडून सांगितलं जात आहे. त्यानंतर आता शिवसेनेच्या बॅनरवरही आनंद दिघेंचा फोटो झळकल्याने ही चर्चा रंगली आहे.
काय आहे बॅनरवर –
आज राज्यभरात आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्याची तयारी सुरु असून, यानिमित्ताने पुण्यातील शिवसैनिकांनी अलका टॉकीज चौकात उद्धव ठाकरेंचा बॅनर लावला आहे. ‘अखंड महाराष्ट्रा सदैव आपल्यासोबत’ असल्याचा उल्लेख यावर करण्यात आला आहे. तसंच बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या फोटोखाली मजकूर लिहिला असून, त्यांनी काय म्हटलं होतं याची आठवण करुन देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांनी ‘आनंद दिघे माझे कट्टर शिवसैनिक’ असं म्हटलं होतं. तर आनंद दिघे यांनी ‘माझी जात-गोत्र-धर्म फक्त शिवसेना’ असं म्हटलं होतं. हे दोन्ही उल्लेख या बॅनरवर करण्यात आले आहेत.