पिंपरीच्या पोटनिवडणुकीत भाजपचे ‘फिक्सिंग’ नसून त्यांनी युती धर्म पाळल्याचा युक्तिवाद रिपाइंच्या नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांनी स्वत:च्या भावाला उमेदवारी दिल्याने सेनेत तीव्र नाराजी असल्याचा आम्हाला फायदाच होईल, असे सांगत आमची लढत शिवसेनेशी नसून राष्ट्रवादीशी असल्याचे सोनकांबळे यांनी स्पष्ट केले.
पिंपरीच्या जिजामाता प्रभागातील पोटनिवडणुकीतील रिपाइं व भाजपचे उमेदवार अर्जुन कदम यांच्या प्रचाराचा आढावा सोनकांबळे यांनी घेतला. भाजपचे शहराध्यक्ष सदाशिव खाडे, आमदार लक्ष्मण जगताप, संपर्कप्रमुख एकनाथ पवार आदी उपस्थित होते. सोनकांबळे म्हणाल्या, मोदी लाट असतानाही भाजपने पोटनिवडणुकीसाठी रिपाइंला जागा सोडली व मैत्री धर्म पाळला. पोटनिवडणुकीसाठी आमदाराने कार्यकर्त्यांला संधी देण्याऐवजी स्वत:च्या भावाला उमेदवारी दिली, त्यावरून शिवसेनेत नाराजी आहे. पालकमंत्री गिरीश बापट व रिंपाइं नेते अविनाश म्हाकवेकर यांच्या सभा होणार आहेत. या प्रभागात विधानसभा निवडणुकीत रिपाइंला सर्वाधिक मते मिळाली आहेत. एकजुटीने काम करत असल्याने रिपाइं उमेदवार निवडून येईल.
 भाजपमध्ये धुसफूस सुरूच
पिंपरी विधानसभेसाठी तीव्र इच्छुक असताना व चहुबाजूने फिल्डिंग लावूनही उमेदवारीसाठी विचार न झालेल्या राजेश पिल्ले यांची नाराजी या निमित्ताने दिसून आली. विधानसभेपाठोपाठ पिंपरी पोटनिवडणुकीसाठी त्यांनी उमेदवारी मागितली. बराच आटापिटा केल्यानंतरही त्यांना उमेदवारी मिळाली नाही. सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांना मनोगत मांडायचे होते. मात्र, त्यांना बोलू देण्यात आले नाही.

Story img Loader