शिवसेनेचे संपर्कप्रमुख गजानन कीर्तीकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांची शुक्रवारी भेट घेतली आणि भोसरीतील स्वयंघोषित ‘गोल्डमॅन’ दत्तात्रय फुगे यांच्याविषयीच्या तक्रारींचा पाढा वाचला. त्यांच्याकडील मालमत्तेची चौकशी करण्याची मागणीही केली.
फुगे यांच्या तक्रारीवरून शिवसेनेचा पदाधिकारी अशोक कोतवाल यास खंडणी प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. तथापि, या प्रकरणात कोतवाल बंधूंना राजकीय वैमनस्यातून अडकवण्यात आले आहे, अशी बाजू मांडण्यासाठी कीर्तीकर यांच्या शिष्टमंडळाने पोळ यांची भेट घेतली. आमदार महादेव बाबर, जिल्हाप्रमुख बाबासाहेब धुमाळ, उमेश चांदगुडे, नगरसेविका सुलभा उबाळे, प्रशांत बधे, विजय फुगे आदींचा त्यात समावेश होता. जवळपास अर्धा तास झालेल्या चर्चेत शिवसेनेने फुगे यांची ‘कुंडली’ पोलीस आयुक्तांसमोर मांडली. फुगे यांच्या पत्नी सीमा फुगे यांचे पद कोतवाल यांच्या तक्रारीमुळे रद्द झाले, त्याचा सूड म्हणून खंडणी प्रकरण घडवून आणण्यात आले. एक कोटीपैकी ६१ लाख रुपयांची खंडणी दिल्याचे फुगे यांनी म्हटले आहे. हे पैसे कुठून आणले, याची पोलिसांनी तसेच आयकर विभागाने चौकशी करावी, असा मुद्दा मांडण्यात आला. भोसरी व परिसरातील अनेकांकडून व्याज देतो म्हणून फुगेंनी पैसे गोळा केले आहेत, त्या नागरिकांच्या तक्रारींची दखल घेण्यात यावी. कोतवाल यांच्या पत्नी सारिका कोतवाल यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी शिष्ट मंडळाने केली. यावर चौकशी पूर्ण झाल्यानंतर योग्य ती कारवाई करू, असे आश्वासन पोळ यांनी दिले.

Story img Loader