सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीमुळे शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणाला उधाण आलं आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. शिंदे गटाकडून संजय राऊतांना लक्ष्य केलं जात असून त्यांच्यावर होणार्या टीका-टिप्पणीवर राऊतही प्रत्युत्तर देत आहेत. या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी आपल्या ट्विटर हँडलवरून रीट्वीट केलेला एक व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत आहे. राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भाषणातला हा व्हिडीओ असून त्यामध्ये अजित पवार नारायण राणेंवर मिश्किल भाषेत टिप्पणी करताना दिसत आहेत. यावपर संजय राऊतांनी अजित पवारांचा ‘कमाल की चीज’ असा उल्लेख केला आहे.
काय आहे संजय राऊतांचं ट्वीट?
संजय राऊतांनी आपल्या ट्वीटमध्ये अजित पवारांना ‘कमाल की चीज’ असा उल्लेख केला आहे. तसेच, नेता असाच असतो असंही राऊत म्हणाले आहेत. “दादा म्हणजे कमाल की चीज! नेता असाच असतो, एकदम मोकळाढाकळा! सहज सोप्या भाषेत थेट संदेश! जय महाराष्ट्र”, असं ट्वीट संजय राऊतांनी केलं आहे.
अजित पवारांचा नारायण राणेंना टोला!
संजय राऊतांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओमध्ये अजित पवार नारायण राणेंविषयी खोचक शब्दांत टिप्पणी करताना दिसत आहेत. अजित पवारांनी नारायण राणेंच्या वांद्र्यातील पराभवाचाही संदर्भ देत त्यांचा पराभव एका महिलेने केल्याचं विधान केलं आहे. “नारायण राणेंनी शिवसेना फोडली. सगळे पडले. राणे साहेब तर दोनदा पडले. एकदा कोकणात आणि एकदा मुंबईत पडले. तिथे तर त्यांना महिलेनं पाडलं. बाईनं पाडलं नारायण राणेंना”, असं अजित पवार या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहेत.
काय घडलं होतं वांद्रे पोटनिवडणुकीत?
२०१५ मध्ये शिवसेना आमदार बाळा सावंत यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेनेनं तृप्ती सावंत यांना तिकीट दिलं. तेव्हा त्यांच्याविरुद्ध नारायण राणे यांनी मातोश्रीच्या अंगणात शिवसेनेला पराभूत करण्याची घोषणाच केली होती. मात्र, त्यांना २० हजार मतांनी तृप्ती सावंत यांच्याकडून पराभूत व्हावं लागलं होतं. यानंतर २०१९मध्ये मात्र शिवसेनेनं तृप्ती सावंत यांना उमेदवारी नाकारल्यामुळे सावंत यांनी बंडखोरी करत भाजपामध्ये प्रवेश केला. शिवसेनेने तिथे मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिली होती. मात्र, काँग्रेसच्या झिशान सिद्दिकी यांनी त्यांचा पराभव केला.