“४ जून रोजी देशातील सर्वात मोठ्या निवडणुकीचा निकाल लागत आहे. तत्पूर्वी दोन दिवस पोलिसांचा मोठा फौजफाटा निकालासाठी तैनात असेल, असा परिस्थितीत मला आणखी ताण वाढवायचा नाही. त्यामुळे पुणे पोर्श अपघात आणि प्रशासनाची कुचराई या प्रकरणी ४ जून नंतरच बोलेन”, अशी भूमिका मांडत असताना शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ससून रुग्णालयाच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हरनोळ यांच्या जीवाला काही बरं-वाईट होऊ नये, अशी चिंता व्यक्त केली आहे.
पुण्यातील कल्याणीनगर भागात भरधाव पोर्श कारमुळे दोघांचा मृत्यू झाला. नामांकित बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने हे कृत्य केल्याचा आरोप असून त्यानंतर गुन्हा लपविण्यासाठी प्रशासनाच्या मदतीने सारवासारव करण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पहिल्या दिवसापासून लावला होता. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीही यातील काही तथ्ये लोकांसमोर मांडली. त्यानुसार येरवडा पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांना निलंबित केले आहे, तर ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हरनोळ यांनी आरोपीचे रक्तचाचणीचे नमुने बदलल्याबद्दल त्यांना अटक केली आहे.
Pune Porsche Crash : रक्ततपासणीवेळी डॉक्टर आणि आरोपीच्या वडिलांमध्ये १४ वेळा संभाषण
आर्यन खान प्रकरणात प्रभाकर साहिलची हत्या
या सर्व विषयावर बोलण्यासाठी सुषमा अंधारे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्या म्हणाल्या, ससूनमधील दोन्ही डॉक्टरांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याची जबाबदारी सरकारची आहे. वर्षभरापूर्वी घडलेल्या अनिल जयसिंघानिया प्रकरणाचा हवाला अंधारे यांनी दिला. तसेच शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि समीर वानखेडे प्रकरणातही केपी गोसावीचा अंगरक्षक प्रभाकर साहिल हा पुढे जाऊन महत्त्वाचा साक्षीदार बनला होता. प्रभाकरच्या जीवाला धोका असल्याचे नवाब मलिक म्हणाले होते. २ एप्रिल २०२२ रोजी प्रभाकर साहिलचा संशयास्पद मृत्यू झाला. ललित पाटील प्रकरणातही पुढे काय झाले? याची माहिती बाहेर आलेली नाही.
पोर्श अपघात प्रकरणात डॉ. तावरेंनी धमकीवजा इशारा दिला आहे. माझ्याकडे बरीच नावे आहेत, मी कुणालाही सोडणार नाही, असे डॉ. तावरे म्हणाले आहेत. अशावेळी डॉ. तावरे यांची सुरक्षितता महत्त्वाची ठरते. कारण पोर्श कार अपघातात इतके बडे प्रस्थ गुंतू शकतात, रक्ताचे नमुने बदलले जाऊ शकतात, पिझ्झा खाऊ घालत १२ तासात जामीन दिला जाऊ शकतो, चालक बदलण्याचा प्रयत्न होऊ शकतो, तर डॉ. तावरे यांच्या जीवाला धोका का होऊ शकत नाही? अशी शंका सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली.
कुणाचं जीव घेणं सोप्प काम नाही – शिरसाट
सुषमा अंधारे यांच्या टीकेला शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, “हे महाराष्ट्र राज्य आहे. कुणाचाही जीव घेणे सोपे काम नाही. त्यांना जर काही शंका असेल तर पोलीस आयुक्त त्याबाबत काळजी घेतील.”