महाराष्ट्र कीर्ती सौरभ प्रतिष्ठानतर्फे मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांना शि‌वशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार जाहीर झाला आहे. एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे जन्मशताब्दी वर्षाचा समारोप आणि तिथीनुसार जन्मदिनाची पूर्वसंध्या असे दुहेरी औचित्य साधून १ ऑगस्ट रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते इतिहास अभ्यासक संदीप तिखे यांना श्रीमंत बळवंत मोरेश्वर पुरंदरे शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे. ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार असून माजी महापौर मुरलीधर मोहोळ या वेळी उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने ‘जाणता राजा’ हे महानाट्य संक्षिप्त स्वरूपात सादर होणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे विश्वस्त अभिषेक जाधव आणि राधा पुरंदरे-आगाशे यांनी गुरुवारी दिली. डॅा. प्रसन्न परांजपे आणि कुंडलिक कारकर या वेळी उपस्थित होते.

‘शतक पाहिलेला माणूस‘चे प्रकाशन –

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या तिथीनुसार नागपंचमीच्या दिवशी (२ ऑगस्ट) होणाऱ्या शंभराव्या जन्मदिनी सह्याद्री प्रकाशनच्या वतीने ‘शतक पाहिलेला माणूस’ या त्यांच्यावरील स्मृतिग्रंथाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.  केसरीवाडा येथील लोकमान्य सभागृह येथे सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमास एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले (निवृत्त), मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर, डॅा. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी आणि भारत इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत उपस्थित राहणार आहेत.

या स्मृतीग्रंथात दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचे लेख, मनोगते आणि अभिप्राय, दुर्मीळ छायाचित्रांचा समावेश आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivshahir babasaheb purandare award announced to dr g b deglurkar pune print news msr